पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कर्मचार्यांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, सॉफ्टवेअरला हजेरीची बायोमेट्रिक यंत्रणा जोडण्यात येणार आहे. चाचणी झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर 1 नोव्हेंबरपासून वेतनासाठी वापरण्यास सुरुवात होईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली. दरम्यान, या सॉफ्टवेअरमुळे वेतन वेळेत मिळण्याच्या फायद्यासोबतच 'लेटलतिफांना' झटका बसणार आहे.
महापालिकेच्या वतीने अधिकारी आणि कर्मचार्यांच्या वेतनासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. महापालिकेचे सुमारे 18 हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांना सध्या वेतन बिल क्लार्कच्या माध्यमातूनच पगार बिल काढण्यात येते. यासाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. अनेकदा यामध्ये त्रुटी राहत असल्याने वेतन मिळण्यात अडचणी येतात. तसेच दुरुस्तींसाठी फाईलही अनेक टेबलवर फिरते. मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करून अधिकारी आणि कर्मचार्यांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर करण्यात आले आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांचा विभाग, हुद्दा आणि वेतनाची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याची या महिन्यात चाचणी घेण्यात आली. ऑनलाइन आणि सध्याच्या ऑफलाइन पद्धतीने तपासणी करण्यात आली. हे सॉफ्टवेअर अचूक काम करीत आहे. परंतु, कर्मचार्यांच्या रजा, खाडे आणि लेटमार्कच्या नोंदी घेण्याची बायोमॅट्रिक हजेरी यंत्रणा या सॉफ्टवेअरला अद्याप जोडलेली नाही. महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांची बायोमेट्रिक नोंदणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्र लावण्यात येत आहे. अद्याप काही कार्यालयांमधील बायोमेट्रिक यंत्रणांची चाचणी सुरू आहे. या महिनाअखेरपर्यंत हे कामही पूर्ण होईल. पुढील महिन्यापासून बायोमेट्रिक यंत्रणा आणि वेतनासाठीच्या सॉफ्टवेअरचा वापर सुरू होईल. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच 1 नोव्हेंबरपासून वेतन देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
हेही वाचा