शिवशक्ती यात्रेचा हेतू सात्विक, राजकारण नाही : पंकजा मुंडे | पुढारी

शिवशक्ती यात्रेचा हेतू सात्विक, राजकारण नाही : पंकजा मुंडे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मुंडे व लोकांची गर्दी हे एक समीकरण असून ठिकठिकाणी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. माझ्याकडे आमदारकी नाही, मंत्रीपद नाही तसेच सत्ताही नाही तरीही लोक येतात, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास कायम राहील. शिवशक्ती यात्रेचा सात्विक हेतू असून यात कोणतेही राजकारण नसल्याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने नांदूरशिंगोटे येथील गोपीनाथ गडाचे दर्शन घेतल्यानंतर रेणुकामाता मंदिर पटांगणात झालेल्या छोटेखानी समेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, तुकाराम महाराज मुंडे, प्रवीण घुगे, अॅड. सर्जेराव तांदळे, बाजार समितीचे सभापती डॉ. रवींद्र पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, माजी महापौर अशोक मुतर्डक, पांडुरंग केदार, बाळासाहेब वाघ, भारत कोकाटे, संजय सानप, नाना भाबड, जगन्नाथ भाबड, संग्राम कातकाडे, सरपंच शोभा बर्के, प्रकाश घुगे, विनायक शेळके, आनंदराव शेळके, तुकाराम मँगाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. नांदूरशिंगोटे परिसराच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या हस्ते पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

माहूर येथील रेणुकामातेच्या दर्शनाने तसेच वेरुळ येथील घृष्णेवराचे दर्शन घेऊन परिक्रमेस सुरुवात केली त्यामुळे मला परळी येथील गोपीनाथगडावर दर्शनासाठी जाता आले नव्हते. त्यामुळे माझ्या मनात खंत होती. मात्र नांदूरशिंगोटे येथील दुसऱ्या गोपीनाथगडाचे दर्शन घेऊन मला मनस्वी आनंद झाल्याचे मुंडे यांनी सांगितले.

तुकाराम महाराज मुंडे व राजाभाऊ वाजे यांनी मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेस शुभेच्छा दिल्या. आनंदराव शेळके यांनी प्रास्ताविक तर शशिकांत येरेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्यातील तसेच नांदूरशिंगोटे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पंकजा मुंडे यांचे सिन्नर तालुक्यात आगमन होताच चिंचोली फाटा, माळेगाव फाटा, सिन्नर, मनेगाव फाटा, गोंदे फाटा, माळवाडी व दोडी येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

पंकजाताईंनी थापली बाजरीची भाकरी 

पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेत नांदूरशिंगोटे येथील एकलव्य नगर या एकमेव आदिवासी वस्तीवर भेटीचा कार्यक्रम ठेवला होता. आदिवासी यांधवांनी सांस्कृतिक कार्यक्रमाने त्यांचे स्वागत केले. तसेच कुळदाचे शेंगोळे, पिठलं, झिरक्याचा रस्सा, चुलीवरची बाजरी, ज्वारीची भाकरी, लसणाचा ठेचा, मसाले भात शेंगदाण्याची पोळी असा गावराण मेजवाणीचा बेतही केला होता. त्याचदरम्यान पंकजाताईंनी वस्तीवरील एका घरात बाजरीची भाकरीही थापली. आदिवासी महिलांना त्याचे भारी कौतुक वाटले.

मुंडे, सांगळे यांचा आदिवासी नृत्यावर ठेका 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त नांदूरशिंगोटे गावात आगमन होताच मुंडे यांच्यावर चार जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. डीजेच्या गजरात, फटक्यांच्या आतषबाजीत व आदिवासी नृत्य सादर करत स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांच्यासह शीतल सांगळे यांनीही आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

Back to top button