पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहशत पसरवण्यासाठी सराइताने दुचाकी जाळल्याची घटना मंगळवारी (दि. 2) रात्री पावणेदहाच्या सुमारास नवी खडकी, यशवंतनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सराइताला अटक केली आहे. सुमीत सुरेश गवळी (वय 28, रा. ताडीगुत्ता झोपडपट्टी, येरवडा) याला अटक केली आहे. विकास कुमार लवगिरे (वय 42, रा. नवी खडकी, यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. विकासच्या दुचाकीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने त्याने मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीला आग लावली. त्यामध्ये दुचाकी जळून खाक झाल्यामुळे डिकीमध्ये असलेले दोन मोबाईल जळाले आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी गवळीला अटक केली आहे.
येरवडा परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने काही दिवसांपूर्वी वाहन तोडफोड केली होती. त्यामुळे येरवडा पोलिसांचा गुन्हेगारांसह टोळक्यावर वचक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वारंवार वाहन तोडफोडीसह वाहन पेटविण्याच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा