पिरंगुट: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारची डंपरला धडक बसली. या अपघाताने कारने समोरून पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. यात कारचालक किरकोळ जखमी झाला. तर कारचे मोठे नुकसान झाले. भुकूम (ता. मुळशी) येथे पुणे-कोलाड-दिघी पोर्ट महामार्गावर शुक्रवारी (दि. 17) साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. (Latest Pune News)
कार्तकि जयेश हाडके (वय 21, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे या अपघातात जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
कार्तकि हाडके या त्याच्या ताब्यातील कारमधून (एमएच 12 एक्सएक्स 2058) मित्रांसमवेत पिरंगुटच्या दिशेने जात होता. तर पिरंगुटहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला (एमएच 12 एक्सएम 1251) हाडकेच्या कारची जोरदार धडक बसली. त्यामुळे कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आणि इंजिनला आग लागली. सुदैवाने हाडकेसह मित्र कारमधून वेळीच बाहेर पडले. या वेळी त्या ठकाणी अग्निशमन केंद्राचा बंब उपलब्ध झाला. 10 ते 15 मिनिटांच्या अंतराने कारला लागलेली आग आटोक्यात आणली. दरम्यान पुणे महानगरपालिकेचा बंब देखील पोहचला.
हाडके हा कार ओव्हरटेक करत होता, या वेळी कारचा वेग खूप होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. डंपर चालकाने डंपरवरील नियंत्रण ठेवल्याने मोठी जीवितहानी टळली. माजी उपसरपंच सचिन बाळासाहेब हगवणे, अंकुश प्रकाश खाटपे, मयूर विजय हगवणे, मंगेश हगवणे, सागर रमेश माझीरे तसेच ग््राामस्थांनी मदतकार्य करत अपघातानंतर वाहतूक सुरळीत केली. या ठिकाणी यापूर्वी सुद्धा खूप मोठे अपघात झालेले आहेत. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या कडेला अतिक्रमण तसेच नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी गतीरोधक टाकण्याची मागणी ग््राामस्थांनी केलेली आहे. याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लक्ष द्यावे; अन्यथा महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला.