Veer Dam Pudhari
पुणे

Bhor Rajgad Water Crisis: भोर-राजगडमध्ये भीषण पाणीटंचाई; धरणांतील पाणी ‘वीर’मध्ये वळवल्याचा आरोप

भाटघर, निरा-देवघर आणि गुंजवणी धरणे मृतसाठ्यात; पूर्व भागातील राजकीय दबावामुळे अन्याय झाल्याचा संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

वैभव धाडवे पाटील

सारोळा: भोर आणि राजगड तालुक्यातील जनतेला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील भाटघर, निरा-देवघर आणि गुंजवणी ही प्रमुख धरणे अक्षरशः मृतसाठ्यापर्यंत रिकामी करून, सर्व पाणी जबरदस्तीने ‌‘वीर‌’ जलाशयात सोडण्यात आले आहे. पूर्व भागातील वजनदार राजकीय नेत्यांच्या दबावाखाली जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे एकतर्फी धोरण राबवल्याचा आरोप होत असून, यामुळे भोर-राजगडच्या जनतेवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

भाटघर, निरा-देवघर आणि गुंजवणी ही तिन्ही धरणे गेल्या चार-पाच दिवसांत कोरडी करून त्यांचे पाणी वीर धरणात वळवण्यात आले. त्यामुळे वीर धरणाची साठवणूक क्षमता 10 टीएमसी असताना त्यात 6 टीएमसीपर्यंत पाणी साठवले गेले आहे. सध्या गुरुवारी (दि. 28) ही पाणीपातळी 4 टीएमसी होती.

वीर धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यांद्वारे बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, अकलूज आणि सोलापूरकडे जाते. येथील बड्या नेत्यांच्या इशाऱ्यावर जलसंपदा विभागाचे अधिकारी नाचत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या अन्यायाविरोधात आपली भूमिका मांडायला घाबरत असून, त्यांनी मवाळ धोरण स्वीकारल्याने जनतेत तीव संताप आहे.

दरम्यान, ‌‘धरण उशाला आणि कोरड घशाला‌’ अशी अवस्था झालेल्या भोर-राजगडमधील पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा आणि जनावरांचा विचार न करता हे पाणी पळवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेला वेठीस धरणाऱ्या भाटघर, निरा-देवघर, गुंजवणीचे शाखाधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

धरणांची सद्यस्थिती आणि आकडेवारी

  • भाटघर जलाशय : 23 टीएमसीपैकी अवघा 1.5 टीएमसी (मृतसाठा) शिल्लक.

  • निरा-देवघर जलाशय : 13 टीएमसीपैकी केवळ 2.25 टीएमसी (मृतसाठा) शिल्लक.

  • गुंजवणी जलाशय : 3.75 टीएमसीपैकी केळ 0.75 टीएमसी पाणी शिल्लक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT