अर्जुन खोपडे
भाेर : भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटमार्गावर अतिवृष्टीच्या काळातच पडलेल्या दरडी अद्यापही हटविण्यात आलेल्या नसून, यामुळे घाट रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. संरक्षण कठडे तुटलेले असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिवजयंतीला जाणाऱ्या शिवप्रेमीची दुचाकी दरीत कोसळून अपघात झाला. प्रवाशांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या घाटातील रस्त्याचे काम निधीअभावी रखडले असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरंधा घाटात ठिकठिकाणी रस्ता खचलेला असून, अनेक वळणांवरील रस्ता अतिवृष्टीत वाहून गेला आहे. येथील कठडे तुटलेले आहेत, तर मोऱ्या-छोटे पूल वाहून गेले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वारवंड ते भोर हद्दीपर्यंत सुमारे १५ किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली असून, हा रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र घाटाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.
भोर तालुक्यातून कोकणात जाणारा जवळचा मार्ग म्हणजे वरंधा घाट आहे. या मार्गावर पावसाळ्यात २१, २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे हिर्डोशी, कोंढरी, वारवंड, कारुंगण, शिरगाव, उंबार्डेवाडी व उंबार्डेगावाच्या हद्दीत ३० ते ४० ठिकाणी डोंगरातील दगड माती, झोड पाण्याच्या प्रवाहाबरोबर रस्त्यावर येऊन मोठ्या दरडी रस्त्यावर पडल्या होत्या. महाड तालुक्याच्या हद्दीत ५ ते ६ ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. त्याची तात्पुरती डागडुजी केली आहे, तर भोरच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील दरडी तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करून एक गाडी जाण्यापुरता रस्ता तयार केला आहे. मात्र, बाजूला केलेल्या दरडी पुन्हा रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाहतुकीस धोकादायक झाला आहे. शासनाने पूर हानी कार्यक्रमांतर्गत सुमारे ५ कोटी निधी मंजूर केला आहे. हा वेळेत निधी खर्च झाला तर निधीचा उपयोग होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.