भोर: भोर-महाड-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी शेतकर्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. जिल्हाधिकार्यांसमवेत बैठक घेण्याची मागणी शेतकर्यांनी केली. सदर बैठक होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता अतुल सुर्वे यांनी दिल्यानंतर शेतकर्यांनी आंदोलन तातपुरते स्थागित केले.
वरंध घाट ते शिंदेवाडी फाटा रस्ता किलोमीटर 81/600 ते 140 प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 15 (नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 265 डीडी) रस्त्याच्या कामासाठी सुमारे 723 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या रस्त्यावरील वडगावडाळ, उत्रौली, वेनवडी, पोम्बर्डी, शिरवलीतर्फे भोर, आंबेघर, पिसावरे, वाठार हि. मा., साळेकरवाडी, नांदगाव, आपटी, निगुडघर येथील शेतकर्यांची जमीन, दुकाने, घरे जात आहेत. (Latest Pune News)
रस्त्यात जाणार्या जमिनीचा कोणताही मोबदला दिला जात नाही. त्यामुळे रस्त्यासाठी जमिनी गेलेल्या शेतकर्यांनी आपटी (ता. भोर) येथे शुक्रवारी ( दि. 13) काम बंद पाडले. राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 15 चे शाखा अभियंता अतुल सुर्वे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकर्यांना भूसंपादन नकाशाप्रमाणे काम सुरू असल्याचे सांगितले.
आमचा रस्त्याच्या कामाला विरोध नाही; परंतु अधिग्रहणापेक्षा जास्त जमिनी रस्त्याच्या कामात जात आहेत. जोपर्यंत जमीन मोबदल्याबाबत जिल्हाधिकार्यांसोबत बैठक होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवा, असे शेतकर्यांनी सांगितले. सुर्वे यांनी जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्यांनी आंदोलन स्थगित केले.
या वेळी जगन्नाथ पारठे, संजय शिंदे, रघुनाथ पारठे, शंकर पारठे, अजय कुडले, नामदेव कुडले, सागर कुडले, लक्ष्मण पारठे, अंकुश मळेकर, अंकुश पारठे, गुलाबराव खुटवड, दत्तात्रय परखंदे, गणेश साळेकर, नारायण पारठे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
महामार्गाला कोणत्याही शेतकर्याचा विरोध नाही. मात्र, रस्त्यात जाणार्या जमिनी, घरे, दुकाने यांचा मोबदला देण्यात यावा. त्यानंतरच काम करावे; अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे आपटी येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पारठे यांनी सांगितले.