यवत: दौंड तालुक्यातील यवत परिसरातील भुलेश्वर पायथा येथे शुक्रवारी (दि. 13) दुपारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. परिणामी, लाटकरवस्तीच्या शेजारी असलेल्या बंधार्याचा भराव फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले आणि यवत-माळशिरस मुख्य रस्ता काही काळासाठी पूर्णतः बंद झाला. या घटनेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक काही काळासाठी थांबवत सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. पाणी ओसरल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Pune News)
स्थानिक नागरिकांनी या वेळी बंधार्याच्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. ’बंधार्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. भराव योग्य पद्धतीने न बसवल्यामुळेच आज हे संकट ओढावले,’ असा आरोप लाटकरवस्तीतील ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी संबंधित ठेकेदार आणि जलसंपदा विभागावर देखील कारवाईची मागणी केली.
दरम्यान, पावसाचे पाणी अचानक रस्त्यावर आल्यामुळे काही दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालक अडकले होते. स्थानिक नागरिकांनी मदतीला धाव घेत या अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.
या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होत असतात. परंतु, यंदा पावसाच्या तीव्रतेमुळे आणि बंधार्याच्या अपयशामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
यवत पोलिसांनी रस्ता सुरळीत झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली असून, यवत-माळशिरस मार्ग आता सामान्य वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुढील पावसाळी दिवसांत अशीच आपत्ती पुन्हा ओढवू नये, यासाठी स्थानिक पातळीवर खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगतात.