अर्जुन खोपडे
भोर: भोलावडे-शिंद गटात तत्कालीन काँग्रेस तर आता भारतीय जनता पार्टीचे दावेदार असणारे विद्यमान सदस्य विठ्ठल आवाळे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवीण जगदाळे, महाविकास आघाडीतून रवींद्र बांदल, वंदना धुमाळ, मानसिंग धुमाळ यांच्यात खरी लढत होणार आहे. माजी आमदार संग्राम थोपटे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शंकर मांडकर यांचा प्रतिष्ठा या गटात पणाला लागणार आहे. त्यामुळे या गटाची लढत रंगतदार होणार असल्याची दाट शक्यता आहे.
भोलावडे-शिंद या गटाचे आरक्षण हे सर्व साधारण जाहिर झाले असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त असून पक्ष श्रेष्ठीपुढे उमेदवारीवरून डोकेदुखी वाढणार आहे. गटाची मूळात रचना ही अवघड परिस्थितीमध्ये झाली असल्यामुळे इच्छुक उमेदवारांपुढे प्रचार करताना मोठी दमछाक होणार असून या गटात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मोठा कस लागणार असल्यामुळे लढत ही रंगतदार होणार असल्याची जास्त शक्यता आहे.
पूर्वी भोलावडे गटातून नसरापुर तत्कालीन कॉंग्रेसचे तर आता भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सदस्य विठ्ठल आवाळे हे प्रमुख दावेदार होते; मात्र या वेळी गटाची रचना बदल्यामुळे त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीतील पक्षातील उमेदवाराचे मोठे आव्हान राहणार आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल आवाळे यांनी गड राखून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून सत्ता मिळवली. मात्र आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रबादी काँग्रेस पक्षाची सावध भूमिका राहणार असल्याचे चित्र आहे. एक पंचवार्षिक वगळता कायम मात्र काँग्रेस या गटात राष्ट्रवादों काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते; राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा तुल्यबळ दाखविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे या गटातून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विठ्ठल आवाळे हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी माजी आमदार संग्राम धोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधीची विकास कामे केली असल्यामुळे मतदारापर्यंत ते पोहचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भोलावडे गावचे विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे हे इच्छुक असल्यामुळे त्यांनी तसा प्रचार सुरू केला आहे. या गटातील भोर पंचायत समितीच्या सभापती हेमलता बांदल यांचे पती हे रवींद्र बांदल हे इच्छुक असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
महिला बाल कल्याण समितीच्या सभापती वंदना धुमाळ यांचा या गटात समावेश होत असून भोर पंचायत समितीचे उपसभापती त्यांचे पती मानसिंग धुमाळ यांनी कायम पंचायत समितीच्या गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व ठेवले होते; मात्र आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत, त्यामुळे या गटात तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही, महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) आणि शिवसेना (उबाठा) गटाची ताकद ही निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे.
नव्याने रचना झालेल्या गटात ६६ गावे
भोलावडे-शिंद गटाची रचना नव्याने तयार झाली असून या गटात ६६ गावांचा समावेश आहे. येवली ते महुडे खुर्द-भानुसदरा, बसरापूर ते सांळुगण वाढाणे, शिरगाव ते कंकवाडी दापकेघर, पिसावरे ते म्हसर खुर्द, म्हसर बुद्रुक, निगुडघर, देवघर, हिर्दोशी अशा पद्धतीने गटाची विभागणी झाली आहे. त्यामुळे उमेदवाराला मतदाराच्या गाठीभेटी घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.