

पुणे : माजी केंद्रिय कृषीमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार हे तहहयात अध्यक्ष असलेल्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट तथा व्हीएसआय (ता.हवेली,जि.पुणे) या संस्थेस साखर संशोधनासह प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया निधी कपात करुन देण्यात येतो. या मूळ उद्देशाप्रमाणे अनुदानाचा विनियोग होतो आहे काय?याबाबत साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापून करुन चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच त्यांनी तपासणी करुन शासनास 60 दिवसांत अहवाल सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.(Latest Pune News)
राज्यातील यंदाचा 2025-26 चा ऊस गाळप हंगाम दिनांक 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. तसा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 30 सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्या बैठकीच्या इतिवृत्तावर शिक्कामोर्तब होऊन शासनाच्या सहकार, पणन विभागाचे उप सचिव अंकुश शिंगाडे यांनी संबंधितांना पाठविले आहे. त्यामध्ये अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्यावेळच्या विषयात चौथ्या क्रमांकांच्या मुद्दयात व्हीएसआयला शासनाकडून वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतचा मुद्दा नमूद आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली असून साखर उद्योगात हा विषय सोमवारी (दि.27) सायंकाळी चर्चेचा झाला होता.
व्हीएसआय संस्थेला मंत्री समितीच्या मान्यतेने प्रत्येक गाळप हंगामातील प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया प्रमाणे निधी कपात करुन देण्याचा निर्णय घेण्यात येतो. तसेच साखर संशोधनासाठी शासन निर्णय 17 जून 2009 प्रमाणे सन 2009-10 या वर्षापासून अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. साखर आयुक्तालयातील सूत्रांच्या प्राप्त माहितीनुसार व्हीएसआयला दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक निधी यामधून दिला जातो. उसाच्या नवनवीन जातींचे संशोधन आणि उपपदार्थांच्या निर्मिती, सल्ला, कृत्रिम बुध्दिमत्ता वापरावर तसेच येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी व्हीएसआयचे काम चालते.
महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या व्हीएसआयला टार्गेट केल्याचे आता बोलले जात आहे. त्यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे. व्हीएसआयच्या विश्वस्तांमध्ये बहुतांशी महाविकास आघाडीचे साखर उद्योगातील वरिष्ठ नेते कार्यरत आहेत. तसेच सर्वपक्षीय संचालकांचाही भरणा अधिक आहे. महायुतीमधील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, जयंत पाटील व अन्य मान्यवरांचा समावेश आहे.