मंचर : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची आगामी गाळप हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सुमारे 12 लाख टन उसाचे गाळप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.(Latest Pune News)
कारखाना तळाजवळील बसस्थानकाच्या पाठीमागे सुमारे 15 एकर क्षेत्रात तसेच काठापूर रस्त्यावरील नव्या 22 एकर जागेत ऊस तोडणी कामगारांनी कोप्या बांधून वास्तव्य केले आहे. यंदाच्या हंगामासाठी ट्रक व ट्रॅक्टर 165, टायर बैलगाड्या 1082, ट्रॅक्टर 1141 तसेच ऊस तोडणी हार्वेस्टर 22 इतकी वाहतूक व तोडणी यंत्रणा सज्ज आहे. या यंत्रणेद्वारे ऊस वाहतूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी कारखान्याने नियोजन केले आहे.
दैनंदिन गाळप सुमारे आठ ते साडेआठ हजार टन केले जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे आणि सचिव रामनाथ हिंगे यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार आणि व्यवस्थापन यांचा समन्वय राखून यंदाचा हंगाम यशस्वीपणे पार पाडण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
भीमाशंकर साखर कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम विक्रमी होणार आहे. 12 लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य यंदा ठेवण्यात आले आहेबाळासाहेब बेंडे पाटील, अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना