मंचर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नाताळ सुट्टी, वर्षअखेर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा महापूर उसळला आहे. गुरुवार (दि. 25) नाताळची सुट्टी असल्याने तसेच शुक्रवारी (दि. 26) रजा टाकून अनेक नोकरदारांनी शनिवार (दि. 27) रविवारसह (दि. 28) सलग सुट्ट्यांचा लाभ घेतल्याने दर्शन व पर्यटनासाठी भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकरकडे दाखल झाले आहेत. देशाच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी भगवान भीमाशंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या.
पहाटेपासून मंदिर परिसर, दर्शनरांगा, वाहनतळ आणि प्रमुख मार्गांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. थंडीचा कडाका असूनही भाविकांचा उत्साह ओसरण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. काही काळ प्रतीक्षा करावी लागत असली तरी भाविक शांततेने रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असून ‘दर्शन महत्त्वाचे’ या भावनेतून भाविक सर्व अडचणी सहन करत असल्याचे दिसून येते.
भाविकांच्या वाढलेल्या संख्येचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला असून, भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. खासगी वाहने, पर्यटकांच्या गाड्या व बस यांची संख्या अचानक वाढल्याने दोन्ही वाहनतळ पूर्णपणे भरून गेले होते. काही वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मात्र पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, मंदिर प्रशासन व स्वयंसेवकांनी समन्वयाने परिस्थिती नियंत्रणात आणली. एकेरी वाहतूक, वाहनांचे टप्प्याटप्प्याने नियोजन तसेच वाहनचालकांना सतत मार्गदर्शन करून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन केल्याने हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली, अशी माहिती मंचर येथील शरद सहकारी बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांनी दिली.
नाताळ सुट्टीमुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, मध्येच वाहन घालू नये आणि पोलिसांना सहकार्य केल्यास वाहतूक सुरळीत ठेवणे शक्य होईल. पुढील काही दिवस भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, भाविकांनी संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी केले.
भीमाशंकर देवस्थान ट्रस्टकडून दर्शन, स्वच्छता, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेसाठी अतिरिक्त कर्मचारी व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व फेरीवाल्यांनाही या गर्दीचा सकारात्मक लाभ होत आहे. पुढील काही दिवस भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशराव कौदरे यांनी सांगितले.
भाविकांमध्ये विशेषतः पहाटेच्या काकड आरती व महादर्शनासाठी मोठी उत्सुकता दिसून येत आहे. अनेक भाविक रात्री उशिरा किंवा पहाटे मंदिर परिसरात दाखल होऊन दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत. भीमाशंकर परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, थंड हवामान आणि आध्यात्मिक वातावरणामुळे भाविकांना मनःशांती लाभत असल्याचे अनेकांनी सांगितले. ‘कितीही गर्दी असली तरी भगवान भीमाशंकराच्या दर्शनाचा आनंद वेगळाच आहे,’ अशी भावना भाविक व्यक्त करत आहेत. देवदर्शनासोबतच अनेक भाविकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष पूजा, अभिषेक व नवस-फेडी केल्याचेही दिसून आले. प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी सतत सूचना देत सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.