संतोष वळसे पाटील
भीमाशंकरला जाताना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. येथील मार्गांवर वाहनांची मोठी कोंडी होते. पायवाटा निसरड्या होतात आणि अपघाताची शक्यता वाढते. निवासस्थानांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक भाविकांना रात्र वाहनांमध्येच काढावी लागते.
या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी भाविक व स्थानिक मंडळींकडून येथे पर्यावरणपूरक प्रकल्प उभारून सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार येथे लहान प्रमाणात निवास केंद्र, सौरऊर्जेवर चालणाऱ्या सुविधा व चांगले रस्ते, यामुळे समस्या कमी होणार आहेत.
पावसाळ्यात दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांची वाहने रस्त्यावर अडकतात. निवास मिळाला नाही, तरीही श्रद्धेमुळे अनेक भाविक दर्शन घेत असतात. मात्र, ज्योतिर्लिंग म्हणून येथे आणखी सोयी असत्या, तर अनुभव अधिक सुखद झाला असता, असे भाविक सांगतात. ट्रस्टकडून निवासव्यवस्था पुरविण्याचा प्रयत्न चालतो.
पण, मोठ्या सुविधा उभारायला वन विभागाच्या परवानग्या लागतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखूनच भाविकांच्या सोयी वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
उपाययोजना व भविष्याचा मार्ग
तज्ज्ञांच्या मते, येथील उपाय म्हणजे पर्यावरणपूरक सुविधा. सौरऊर्जा, पावसाचे पाणीसाठवण, जैवविघटनशील शौचालये, नियंत्रित वाहतूकव्यवस्था, अशा योजना राबवून भाविकांना सोय केली जाऊ शकते. याकडे सरकार आणि देवस्थान समितीने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासन, वन विभाग व देवस्थान ट्रस्ट या तिघांनी एकत्र येऊन समन्वय साधला, तर धार्मिक पर्यटन व संवर्धन दोन्हींचा फायदा होईल. धार्मिक स्थळांची प्रतिष्ठा भाविकांच्या अनुभवावर टिकून राहते. भीमाशंकर येथे भाविकांना मूलभूत सुविधा मिळाल्या, तर हे क्षेत्र धार्मिक पर्यटनासोबतच राज्याच्या अर्थकारणालाही मोठी चालना देऊ शकते. भविष्यात सुविधा वाढल्या, तर भाविकांची सोय होईल आणि मंदिराचा मानही अधिक उंचावेल.