

हडपसर: विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना हडपसर परिसरात काही दारू माफिया खुलेआम हातभट्ट्या चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शिवसेनेने (शिंदे गट) आक्रमक पावित्रा घेत कृष्णानगर, तरवडेवस्ती पोलिस चौकीच्या पाठीमागील परिसर, तसेच साठेवस्ती भागात सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून शेकडो लिटर दारूसाठा नष्ट केला.
विषारी दारूमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना हडपसर परिसरात अवैध दारू धंदे सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या हातभट्ट्या प्रशासनाला दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल या वेळी शिवसैनिकांनी उपस्थित केला. शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे म्हणाले की, हडपसर हा दारू माफियांचा अड्डा नसून कष्टकरी, प्रामाणिक आणि कायद्याचा सन्मान करणाऱ्या नागरिकांचा परिसर आहे.
त्यामुळे अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील शिवसेनेचा लढा यापुढे अधिक तीव करण्यात येणार आहे. या वेळी प्रवीण हिलगे, विक्रम घाडगे, रोहित भालचिंम, प्रकाश कालगुडे, गणेश साळुंखे, माऊली साळुंखे, रवी लोखंडे, सुरज खिल्लारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि नागरिक या वेळी उपस्थित होते.