Bhima River Water Level Rise Pudhari
पुणे

Bhima River Water Level Rise: भीमा नदीची पाणीपातळी वाढली; दौंडमध्ये शेतकऱ्यांची ऊस लागणीसाठी लगबग

पावसाच्या पुनरागमनामुळे नदीकाठच्या मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; ऊस लागणीच्या कामांना मिळणार वेग

पुढारी वृत्तसेवा

नानगाव: जून महिना विश्रांती घेतलेल्या पावसाने जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात व डोंगर भागात दमदार सुरुवात केल्यामुळे खाली वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होताना दिसून येते आहे. दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची नदीकाठच्या विद्युत मोटारी काढण्यासाठी लगबग सुरू झाल्याची वस्तुस्थिती पहावयास मिळत आहे.

सात जूनला पावसाला सुरुवात होते त्यामुळे जून महिन्यात दौंड तालुक्यातील बागायती भागात ऊसाच्या लागण्यांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते.मात्र यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाच्या लागणींची कामे खोळंबली होती.शेतकरी बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आकाशाकडे डोळे लावून बसला होता.

एकीकडे जून महिन्यात पावसाने फिरवलेली पाठ तर दुसरीकडे भीमेच्या पाणीपातळीत होणारी घट या दुहेरी संकटात शेतकरी सापडला होता.ऊसाच्या लागवडीसाठी मशागती पुर्ण करुन शेतकरी पावसाची वाट पाहत होतो.मात्र जून महिन्यात पावसाने हजेरी लावली नसल्याने यंदा ऊसाच्या लागणी लांबणीवर जाणार असल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत होते‌.

मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात व डोंगर भागात हळूहळू सुरुवात केली आणि भीमेच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली.तर गेली दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सध्या दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या विद्युत मोटारी पाण्याखाली बुडून जाऊ नये म्हणून शेतकरी नदीकाठच्या विद्युत मोटारी काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.तसेच रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे शेतात देखील काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे.सध्यातरी हळूहळू पाऊस पडत असल्यामुळे लांबणीवर पडलेल्या ऊसाच्या लागणीच्या कामांना वेग येणार असल्याची वस्तुस्थिती पहावयास मिळत आहे.

मागील वर्षी जास्त पावसामुळे ऊसाच्या लागणींचे नुकसान झाले तर यंदाच्या वर्षी काही ठिकाणी पाऊस न पडल्याने केलेल्या उसाच्या लागणींचे नुकसान झाले.मात्र सध्या पावसाने हजेरी लावल्याने ऊसाच्या लागणीच्या कामांना वेग येणार आहे.

नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने विद्युत मोटारी काढल्या असल्या तरी देखील पडणाऱ्या पावसामुळे शेतातील ऊसाच्या लागती होतील असा अंदाज शेतकरी वर्गातून वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT