पुणे : ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या एअरोस्पेस विभागाने भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सध्या सुरू असलेल्या इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट-व्हीआय (ईपी-व्हीआय) या आराखड्यांतर्गत कंपनीने भारतीय लष्करासोबत सुमारे 300 कोटी रुपयांचे करार केले आहेत. हेरगिरीसाठी आवश्यक स्वदेशी मानवरहित प्रणाली विकसित केली जाणार आहे.
या करारांमध्ये हेरगिरी, पाळत ठेवणे आणि माहिती संकलन (आयएसआर) याविषयीची प्रणाली तसेच ‘लॉइटरिंग म्युनिशन्स’सह विविध प्रकारच्या स्वदेशी मानवरहित प्रणालींचा समावेश आहे. ओमेगा वन, ओमेगा नाइन, बेयोनेट आणि क्लीव्हर हे करारबद्ध प्लॅटफॉर्म्स असून, विविध भूप्रदेशांमध्ये आणि वेगवेगळ्या मोहिमांसाठी त्याचा वापर करता येईल.
जयपूर येथे 15 जानेवारी रोजी झालेल्या ‘आर्मी डे परेड’मध्ये अद्ययावत ‘बीएमपी-2’ या पायदळ लढाऊ वाहनावर ‘ओमेगा वन’चे भव्य प्रदर्शन करण्यात आले. ‘भारत फोर्ज लिमिटेडचा मानवरहित प्रणालींचा पोर्टफोलिओ वेगाने विकसित होत आहे. प्रगत स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया या सर्व बाबी हळूहळू सर्व प्लॅटफॉर्म्समध्ये समाविष्ट केल्या जात आहेत.
“ईपी-व्हीआयअंतर्गत करार मिळणे आणि आर्मी डेच्या दिवशी ओमेगा वनचे प्रदर्शन होणे, या दोन्ही गोष्टींमधून ‘आत्मनिर्भर भारत’साठी बीएफएलची बांधिलकी स्पष्ट होते,” असे भारत फोर्जचे उपाध्यक्ष व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले. “भारताच्या सशस्त्र दलांसाठी या खास भारतात तयार केलेल्या, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि पूर्णपणे स्वदेशी मानवरहित प्रणाली देताना आम्हाला अभिमान वाटतो.” असेही ते म्हणाले.