पुणे

सावधान! चोरट्यांच्या नव्या मोडस् ऑपरेंडीमुळे वाढली डोकेदुखी

Sanket Limkar

[author title="संतोष शिंदे " image="http://"][/author]

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दारात आलेल्या चोरट्यांकडून स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पितळी मुलामा असलेल्या दागिन्यांचा आवळा देऊन चोरटे मोठी रक्कम म्हणजेच कोहळा काढून फरार होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील काही दिवसांपासून अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

महिला 'टार्गेट'

घरासमोर बसलेल्या महिलांना चोरटे 'टार्गेट' करतात. सुरुवातीला पिण्यासाठी पाणी मागून चोरटे महिलांना बोलण्यात गुंतवतात. विश्वास संपादन केल्यानंतर दागिन्याच्या विक्रीबाबत बोलले जाते. महिलादेखील उत्सुकतेने दागिना पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. पितळी मुलामा असलेला दागिना सोन्याचा समजून महिला भारावून जातात. कमी किमतीत मिळत असल्याने महिलेकडून दागिना खरेदी केला जातो. पुरुषांच्या तुलनेत महिला अशा प्रकारांना जास्त प्रमाणात बळी पडत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

भोंदूबाबांचा सुळसुळाट

सोन्याच्या दागिन्याप्रमाणेच राशिभविष्य सांगून खडे देण्यात भोंदूबाबांचादेखील शहरात सुळसुळाट झाला आहे. धातूच्या भांड्यात राशीचा खडा टाकून आवाज केला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या हातावर खडा ठेवून खडा राशीला तंतोतंत जुळत असल्याचे सांगतात. भविष्यात मोठे आर्थिक फायदे होतील, असे सांगून काही हजारांमध्ये खड्याची किंमत सांगितले जाते. आर्थिक संकटात सापडलेले नागरिक उसनवारी करून खडा खरेदी करतात. दरम्यान, शास्त्रीय पद्धतीने तपासणी केल्यानंतर संबंधित खडा बनावट असल्याचे समोर येते. यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक, नोकरदार यांची फसवणूक झालेली आहे; मात्र बदनामीच्या भीतीने समोर येऊन तक्रार दिली जात नाही. त्यामुळे पोलिसांकडे अशा प्रकरणांच्या नोंदी कमी आहेत.

…अशी आहे 'मोडस'

दारात आलेल्या चोरट्याकडून आपल्याला गावाकडे शेती करताना, रस्त्याने चालताना, बसमध्ये सोन्याची माळ किंवा इतर दागिना सापडल्याचे ते सांगतात. पावती नसल्याने दागिन्याची विक्री करताना अडचणी येत असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. पितळी मुलामा असलेला दागिना दाखवून चोरटे नागरिकांना भुरळ पाडतात. नागरिकही स्वस्तात सोने मिळत असल्याने लगेच पैशांची तजवीज करतात. एकदा पैसे हातात पडले की, चोरटे पसार होतात. दरम्यान, सोनाराकडे गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांना समजते. त्यानंतर नागरिक पोलिसांकडे धाव घेतात; मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

उदाहरण…

१. पितळी मुलामा दिलेले पेंडल सोन्याचे असल्याचे सांगून एका आकाश दीपक पाटील (26, रा. भुकूम, ता. मुळशी) यांची तीन लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 मे रोजी पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला घडला. या प्रकरणी त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू, विशाल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. पिवळ्या रंगाच्या मण्यांची माळ सोन्याची आहे, असे भासवून बाबासाहेब सीताराम पौळ (42, रा. किवळे) यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 14 ते 21 मे या कालावधीत घडला. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट सोने देऊन फसवणूक केल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. दारात आलेल्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. तसेच, त्यांच्याशी कोणतीही खासगी माहिती शेअर करू नये. सोने सापडल्याची कोणी बतावणी करीत असल्यास स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.

– स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT