पुणे: विद्युतरोषणाईने उजळलेले मंदिर...फुलांनी सजविलेला मंडप...खास बंगाली पद्धतीची केलेली सजावट....बंगाली समाजबांधवांनी एकत्र येऊन घेतलेले देवीचे दर्शन अन् बंगाली प्रथेनुसार केलेले धार्मिक उपक्रम..असे उत्साही वातावरण बंगाली दुर्गोत्सवानिमित्त ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. बंगाली दुर्गोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, दुर्गोत्सवाचा आनंद समाजबांधवांमध्ये पाहायला मिळत आहे. दुर्गापूजेत अन् धार्मिक उपक्रमातही समाजबांधव बंगाली पेहराव करून सहभागी होत असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून बंगाली संस्कृतीचे-पंरपरेचे दर्शन घडत आहे.
विविध ठिकाणची मंदिरे आणि संस्थांनी आयोजित केलेल्या दुर्गोत्सवात बंगाली पद्धतीचे वातावरण रंगले आहे. मंदिरांमध्ये यंदाही परंपरेप्रमाणे बंगाली पद्धतीची सजावट केली आहे. शनिवारी (दि. १७) समाजबांधवांनी मंदिरांमध्ये गर्दी करत देवीचे दर्शन घेत सुख-समृद्धीची कामना केली. तर विविध संस्थांनी आयोजिलेल्या दुर्गोत्सवातही दुर्गापूजा झाल्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. बंगाली संस्कृतीचे दर्शन घडविणार्या कार्यक्रमांनी मने जिंकली.
खडकीतील पुणे काली बारी मंदिरातही उत्सवाला आनंदाने, उत्साहाने सुरुवात झाली असून, समाजबांधवांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिराचे अनुप दत्ता म्हणाले, यंदाचा उत्सवही आनंदात आणि उत्साहात दुर्गोत्सव साजरा होत आहे. मंदिरात दर्शनासाठी समाजबांधव येत आहेत. एक वेगळाच उत्साह सगळ्यांमध्ये पाहायला मिळाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही काँग्रेस भवन येथे बंगीयो संस्कृती संसद संस्थेच्या वतीने दुर्गोत्सव साजरा केला जात आहे. समाजबांधव दर्शनासाठी गर्दी करत असून, येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही बंगाली संस्कृती-परंपरेची झलक पाहायला मिळत आहे. बंगाली पद्धतीच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही खवय्यांना घेता येत आहे.