अमृत भांडवलकर
सासवड : नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या मतदारसंघात येते, त्या जिल्हा परिषद बेलसर गट व पंचायत समितीचे बेलसर आणि माळशिरस गणात यंदा बहुरंगी सामना पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या सर्वच पक्षांत दिग्गज चेहरे आहेत. त्यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या गटात ‘हायव्होल्टेज’ लढतीत सर्वपक्षीय नेत्यांची कसोटी लागणार आहे.(Latest Pune News)
या मतदारसंघातील पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी ही गावे विमानतळाच्या संपादन क्षेत्रात येतात. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत यापैकी पारगाव आणि खानवडी या गावांनी माजी आमदार संजय जगताप यांना मोठे मताधिक्य दिले. तर एखतपूर, मुंजवडी या गावांनी आमदार विजय शिवतारे यांना साथ दिली. सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही असेच चित्र राहिले. संजय जगताप यांच्याप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत विमानतळाला विरोधाची भूमिका ठेवत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर इथून विजय मिळविला. पुढे त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
बेलसर गट सर्वसाधारण झाल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. या गटात शरद पवार गटातून सुदामराव इंगळे, माणिकराव झेंडे पाटील, गौरव कोलते, सारिका इंगळे आदी नावांची चर्चा सुरू असल्याचे जाणवते. शिवसेनेच्या गोटात रमेश इंगळे, शिवतारे यांचे सचिव माणिक निंबाळकर, कैलास कामथे यांच्या नावाची चर्चा आहे. तर, ॲड. शिवाजी कोलते, माऊली यादव, संभाजी काळाणे अशा नावांची भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दत्तात्रय झुरंगे यांची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
बेलसर गण सर्वसाधारण झाल्याने दिग्गजांना मोठी संधी निर्माण झाली आहे. बेलसर गटाचा विचार करता या गटावर काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसच्या सुनीता बाळासाहेब कोलते या निवडून आल्या होत्या. आता काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या संजय जगताप यांची यंदाच्या निवडणुकीतील भूमिका निर्णायक ठरेल. या गणात सुनीता कोलते, नीलेश जगताप, रवी फुले अशा नावांची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या गोटात धीरज जगताप, बाळासाहेब कोलते, शिवनाना कामथे यांच्या नावांची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कैलास जगताप, तर शरद पवार गटात राजेंद्र भोसले, गणेश होले, ॲड. बाबासाहेब पिलाणे आदी नावांची चर्चा सुरू असल्याचे जाणवते. या इच्छुकांना विमानतळ विरोधक यंदा कितपत साथ देतील, याबाबत शंका आहे.
माळशिरस गण सर्वसाधारण झाल्याने शिवसेना आणि भाजपकडून जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या गणात शिवसेनेच्या संतोष यादव, अनिल भगत यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून विलास खेसे, हनुमंत काळाणे, महादेव शेंडकर, दीपक यादव हे पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून संतोष कोलते, अजिंक्य कड, वंदना जगताप आदी इच्छुक आहेत. तर, शरद पवार गटातून प्रा. जितेंद्र देवकर, अरुण यादव हेदेखील इच्छुक आहेत. मतदारांच्या गावभेटी, दिवाळी फराळ वाटप, देवदर्शन यात्रा यातून इच्छुकांनी आपला गट आणि गण पिंजून काढायला सुरुवात केली.