पुणे : शिवाजी शिंदे : थकलेले भाडे, वाढलेले वीजबिल आणि नोकरी व्यवसायात आलेली खंडित अवस्था याच्या परिणामामुळे बीअरची मागणी कमी झाली आहे. परिणामी परवान्यांचे नूतनीकरण करण्यास चालकांकडे रक्कमच नाही. त्यामुळे पुणे शहरासह विभागातील बीअर शॉपीच्या व्यवसायात कमालीची घट झाली आहे.
गेल्या सहा ते आठ महिन्यांत पुणे शहरातील 50, तर विभागातील सुमारे सत्तरहून अधिक बीअर शॉपी बंद पडल्या आहेत. उर्वरित बीअर शॉपीचालकांचा व्यवसायही अडचणीत सापडला असून, त्याचीही दारे अखेरची घटका मोजित असल्याचे चित्र दिसून आले आहे. कोरोनामुळे सर्वच उद्योग-व्यवसाय अडचणीतून वाटचाल करीत आहेत. त्यामुळे कित्येकांच्या नोकर्या कायमस्वरूपी गेल्या आहेत, तर कित्येक जण नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातच पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये असलेली तरुणाई 'वर्क फ्रॉम होम' स्वरुपात काम करीत आहे. याच्या परिणामामुळे माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये ओस पडली आहेत.
पुणे शहरात जास्तीत जास्त 'बीअर शॉपी'ची माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या परिसरात आहेत. लोकसंख्येनुसार बीअर शॉपी सुरू करावयाची असल्यास पुणे शहरात त्याच्या परवान्यासाठी (लायसन्स) दोन लाख 42 हजार 550 रुपये मोजावे लागतात. प्रत्येक वर्षी शॉपीच्या परवान्याचे नूतनीकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाकडे करावे लागते. त्यासाठी तेवढीच रक्कम मोजावी लागते, तर ग्रामीण भागात मात्र परवाना आणि त्याच्या नूतनीकरणाची फी कमी आहे. मात्र, ग्रामीण भागात तेवढ्या प्रमाणात बीअरची विक्री होत नसल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. पुणे विभागातील नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत बीअर शॉपींची संख्या पुणे शहराच्या मानाने कमी आहे.
पुणे शहरात 550 बीअर शॉपी आहेत. गेल्या काही वर्षांत या बीअर शॉपींची संख्या हळूहळू वाढली होती. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाउन सुरू झाले आणि या बीअर शॉपींना आपोआपच 'टाळे' लागले. परिणामी काही बीअर शॉपीचालकांच्या मालकीच्या असल्यामुळे त्यांनी तोटा सहन केला. मात्र, बहुतांश बीअर शॉपीचालकांनी भाड्याने गाळे घेतले आहेत. मात्र, व्यवसायच बंद असल्यामुळे या चालकांना भाडे देणे अवघड बनले आहे. याशिवाय व्यावसायिक दराने आलेली वीजबिले देणेही शक्य झालेले नाही. या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे अचानक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बीअर शॉपी बंद करण्यास चालकांनी सुरुवात केली. परिणामी उत्पादन शुल्कच्या महसूलावरदेखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
''कोरोनाच्या लॉकडाउनमुळे शहरासह विभागात बीअर शॉपीच्या व्यवसायात मोठी घट आली आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी शॉपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.''
– प्रसाद सुर्वे, उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे
शहर शॉपीची संख्या बंद झालेली दुकाने बंदसाठी अर्ज दाखल
पुणे 550 34 10
नगर 110 3 0
सोलापूर 282 33 5