Bavdhan Leopard Spotted Pudhari
पुणे

Bavdhan Leopard Spotted: पुण्याच्या बावधनमध्ये बिबट्या 'स्पॉट'! राम नदीत पाणी पितानाचा फोटो व्हायरल; वन विभागाने नदीपात्रात लावले ट्रॅप कॅमेरे

पाषाणमधील सिंध सोसायटीच्या कॅमेऱ्यात दिसलेला बिबट्याच असण्याची शक्यता; हॉटेल डी-पॅलेसमागे जातानाचा व्हिडिओही व्हायरल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : बावधन येथील राम नदीत सोमवारी सकाळी बिबट्या पाणी पिताना दिसला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. एका नागरिकाने प्रत्यक्ष बिबट्याचे फोटो काढून वन विभागाला पाठवले, मात्र काही वेळातच बिबट्या तेथून पसार झाल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वन विभागाने लोकांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून वन विभाग औंध भागासह लोहगाव विमानतळ अशा दोन वेगवेगळ्या भागांत बिबट्याचा शोध घेत होते. कारण पाषाण भागातील सिंध सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो मध्यरात्री 3.30 वाजता वावरताना दिसला होता. त्याचे हे चित्रण शहरासह राज्यात व्हायरल झाले. त्यानंतर अफवांचे पेव फुटले. त्याना तोंड देताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. आठ दिवस शोध घेऊनही हा बिबट्या त्या भागात सापडलाच नाही.

सोमवारी, 1 डिसेंबरला सकाळी 11.30 ते दुपारी 12 च्या दरम्यान बिबट्याचे राम नदीपात्रातील फोटो व्हायरल झाल्याने तोच बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाने प्रसारमाध्यमांना सावधपणे दिली. तो बिबट्या स्पॉट झाला असे वनअधिकाऱ्यांचे मत आहे. प्रत्यक्षात सिंध सोसायटी भागातील बिबट्या आणि सोमवारी सापडलेला बिबट्या वेगळा असू शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.

हॉटेल डी-पॅलेसमागे रात्री तो दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल

प्रत्यक्षात माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी रविवारी रात्री 12.30 वाजता एक पोस्ट टाकत बिबट्या बावधन येथील हॉटेल डी-पॅलेसच्या मागे जातानाचा व्हिडीओ व्हायरल केला. तसेच वन विभागासह पोलिसांना कळवत नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या. या व्हिडीओत बिबट्या हळूवारपणे रस्ता ओलांडून झाडीत जात असल्याचे दिसत आहे.

सोमवारी सकाळी पुन्हा दिसला; वन विभागाची घटनास्थळी धाव

दिलीप वेडे पाटील यांची पोस्ट व्हायरल होताच सोमवारी सकाळी बिबट्या राम नदीपात्रात पाणी पिताना दिसला. याचे स्पष्ट फोटो हाती येताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी जात बिबट्याचा शोध घेतला. मात्र, तो तेथून पसार झाला होता. बिबट्याचे नदीत पाणी पितानाचे स्पष्ट फोटो दिसल्याने अखेर वन विभागाने त्यांच्या भाषेत शहरात बिबट्या स्पॉट झाल्याचे जाहीर केले. वन विभागासह रेस्क्यू संस्थेची टीम सर्व सामग्री सह तेथे गेली. तेथे ट्रॅप कॅमेरे आणि सापळा रचण्यात आला आहे.

शहरात फिरणारा बिबट्या स्पॉट झाला आहे. एका व्यक्तीने राम नदीत पाणी पितानाचे फोटो पाठवल्याने आमची टीम तेथे गेली. तेव्हा त्या भागात त्याच्या पायाचे ठसे दिसले, त्यामुळे बिबट्या याच भागात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तो आम्हाला पुन्हा दिसला नाही. त्यामुळे तेथे मोठा पहारा लावला आहे. नागरिकांनी घाबरू नये, सावध रहावे.
विशाल चव्हाण, सहायक वनसंरक्षक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT