वडगाव निंबाळकर: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे टक लावून बसला आहे. या परिसरात श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. दमदार व मोठा पाऊस झाल्याशिवाय ऊस लागण होणार नसल्याने शेतकरी वर्ग सध्या चिंताग्रस्त आहे. या परिसरातील पाण्याची सर्व भिस्त ही निरा डावा कालव्यावर अवलंबून आहे.
सध्या कालव्याचे आवर्तन बंद आहे. त्यामुळे एक तर मोठ्या पावसाची प्रतीक्षा करणे किंवा निरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाची वाट पाहणे हेच शेतकऱ्यांच्या हातात आहे. निरा डावा कालव्याला वीर धरणातून पाणी मिळते.
वीरच्या पाणलोट क्षेत्रातही सध्या पावसाची परिस्थिती तितकीची चांगली नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी कधी मिळेल याचा विचार शेतकरी करत आहेत. त्यात दमदार पाऊसही होत नसल्याची स्थिती आहे. या दोन गोष्टींवरच या भागातील शेतीचे गणित अवलंबून आहे.
सध्या या परिसरात ज्यांच्या विहिरीला, बोअरवेलला थोडेफार पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी धाडसी निर्णय घेऊन थोड्या फार प्रमाणात एक जुलैला उसाच्या रोपांची लागण केली आहे. सध्या या भागात थोड्या फार प्रमाणात पावसाची रिमझिम चालू आहे. त्यामुळे नवीन लागण केलेल्या रोपांना जीवदान मिळत असले तरी आडसाली व शेतातील उभे पीक जगवावे की, नवीन रोपांना पाणी द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होतो आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला तरी या भागातील शेतकरी आनंद होऊन जातो. सध्या धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे. पण त्या तुलनेत धरणात पाणी जमा होत नाही. त्यामुळे कालव्याला पाणी कधी येणार याची विवंचना लागली आहे. खरीप हंगामातील बाजरी, तूर, घेवडा याची अद्याप कुठेही पेरणी झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगाम हातचा निघून जातोय की काय, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.