Wedding Pudhari
पुणे

Baramati Wedding Season Business Boost: बारामतीत लग्नसराईचा जल्लोष; बाजारपेठेत आर्थिक उभारी

उन्हाच्या कडाक्यातही विवाहसोहळ्यांची धामधूम; हॉटेल, केटरिंग व्यवसायात तेजी

पुढारी वृत्तसेवा

बारामती: महिनाभराच्या खंडानंतर बारामती तालुक्यात पुन्हा एकदा लग्नसराईचा जोर चढला आहे. उन्हाच्या कडाक्यातही विवाह सोहळ्यांची धामधूम सुरू झाली आहे. घोड्यावर बसलेला नवरदेव, डीजे-बँडच्या तालावर थिरकणारी वरात, मंगलाष्टकांचा गजर आणि ‌‘शुभमंगल सावधान‌’च्या घोषणेसह होणारा टाळ्यांचा कडकडाट असे वातावरण तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

21 एप्रिलपासून लग्नहंगामाला सुरुवात होत आहे. एप्रिल ते जुलैदरम्यानच्या मुख्य 28 मुहूर्तांमध्ये तालुक्यात हजारो विवाह सोहळे पार पडणार असून, त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेला मोठा आर्थिक बूस्ट मिळत आहे. सध्या तापमान 40 अंशांच्या घरात असतानाही लग्नसोहळ्यांची रंगत कमी झालेली नाही. दुपारच्या वेळेत काही प्रमाणात मरगळ असली, तरी सायंकाळी आणि रात्री विवाह सोहळ्यांना विशेष गर्दी होत आहे. थंड पेय, आइस्क्रीम, फळांचे स्टॉल यांनाही मोठी मागणी वाढली आहे.

यंदाच्या लग्नसराईत जुनीच लोकप्रिय गाणी पुन्हा ट्रेंडमध्ये आली असून, वरातींमध्ये याच गाण्यांवर नाचण्याचा जल्लोष रंगताना दिसत आहे. याशिवाय, या लग्नसराईमुळे हजारो युवकांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला असून, बँड पथक, केटरिंग, सजावट, वाहन सेवा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम मिळत आहे.

हॉटेल, केटर्सना ‌‘अच्छे दिन‌’

लग्नसराईमुळे बारामतीतील हॉटेल्स, मंगल कार्यालये, केटरर्स, डेकोरेशन, बँड पथक, फोटोग््रााफर, मेकअप आर्टिस्ट अशा सुमारे 50 हून अधिक व्यवसायांना मोठी चालना मिळाली आहे. विशेषतः केटरिंग व्यवसायात चांगलीच तेजी आली असून, ‌‘अच्छे दिन‌’ आल्याची भावना व्यावसायिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नेतेमंडळींची लग्नात पळापळ

तालुक्यातील राजकीय नेते आणि पदाधिकारी यांचीही लग्नसराईमुळे चांगलीच पळापळ सुरू झाली आहे. एका दिवसात अनेक विवाह सोहळ्यांना उपस्थित राहून शुभेच्छा देताना त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लग्नसमारंभांना हजेरी लावण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT