

उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून, हे शहर आता गुन्हेगारीचे ‘हब’ बनू लागले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शहरात सर्रासपणे कोयते, कुऱ्हाडी आणि काठ्यांचा वापर करून दहशत माजवली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आता गुन्हेगारांकडे गावठी कट्टे देखील उपलब्ध झाली असून, यामुळे शहरात एखाद्या मोठ्या अनर्थाची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील 15 दिवसांत गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुणे येथील पथकाने एकाला पिस्तूल आणि काडतुसासह अटक केली असली, तरी शहरात अनेक भुरट्यांकडे अद्यापही गावठी कट्टे असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दोन गटांतील वाद सोडवायला गेलेल्या नागरिकांवरच गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले आहेत. दुसरीकडे, ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ते सराईत गुन्हेगार मात्र राजकीय पाठबळामुळे मोकाट फिरत आहेत. पोलिसांकडून त्यांना तडीपार केले जात नसल्याने सामान्य नागरिक, व्यावसायिक आणि व्यापारीवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.
दौंड पोलिस ठाण्याच्या दारातच काही दिवसांपूर्वी सत्तूर आणि कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना घडली. मात्र, या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार शहरात खुलेआम फिरत असतानाही पोलीस त्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. या गुन्हेगारांचे ‘मोबाईल सीडीआर’ तपासून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्याची मागणी होत आहे. एकूणच गुन्हेगार मस्त, पोलीस सुस्त आणि ग्रामस्थ त्रस्त अशी परिस्थिती आहे.
...तर यवतची पुनरावृत्ती अटळ!
यवतमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या भीषण घटनेची आठवण करून देत दौंडमधील नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. जर पोलिसांनी वेळीच सावध होऊन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर दौंडमध्येही गोळीबारासारख्या घटना घडून एखादे मोठे हत्याकांड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
औद्योगिक वसाहतीत ‘वर्गणी’च्या नावाखाली खंडणी?
शहरातील काही राजकीय पक्षांचे नेते कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांच्या नावाखाली सक्तीने वर्गणी गोळा करत असल्याचे वृत्त आहे. ही एक प्रकारे ‘खंडणी’च असून, भीतीपोटी अधिकारी हे पैसे देत असल्याची चर्चा आहे. या प्रकाराची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नागरिकांचा प्रशासनाला सवाल
पोलिस अधीक्षक दौंडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत गप्प का आहेत?
सराईत गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणारे ‘ते’ नेते कोण?
पोलीस ठाण्यासमोर राडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार?