बारामती: बारामती तालुक्यातील बागायती पट्ट्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने उपलब्ध पाण्यावर मर्यादा आल्या आहेत. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने ऊसतोडणीतून जनावरांसाठी चारा उपलब्ध होत आहे. मात्र, फेब्रुवारीपासून पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
त्यामुळे निंबुत, मुरूम, होळ, कोऱ्हाळे आणि लाटे परिसरातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना ढापे बसवून वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बारामती तालुक्याचा पश्चिम भाग प्रामुख्याने बागायती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. निरा नदी आणि निरा डावा कालवा हे या भागातील शेतीचे प्रमुख जलस्रोत आहेत. पूर्वी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना पाणीटंचाईची फारशी चिंता नव्हती. मात्र, आता जलसाठे कमी होऊ लागल्याने पाण्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भूजलपातळीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी विहिरींची पाणीपातळी घटल्याने ऊस, फळबागा आणि इतर पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कालव्याचे आवर्तन बंद असल्याने विहिरी आणि उपलब्ध जलस्रोतांच्या आधारे पिके जगविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या सोमेश्वरसह परिसरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने ऊसतोडणीनंतर जनावरांसाठी चारा उपलब्ध होत आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न तूर्त काही प्रमाणात सुटला असला, तरी आगामी काळात पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास शेतीसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावांसह बागायती क्षेत्राला दिलासा मिळू शकतो. नदीपात्रातील पाणीसाठा वाढल्यास परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीलाही आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने बंधाऱ्यांची स्थिती तपासून त्यांना ढापे बसविणे आणि नदीत पाणी अडविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा
बागायती पट्ट्यात पूर्वी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. आता जलसाठे कमी होत असल्याने प्रत्येक थेंबाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, ठिबक सिंचनासारख्या पद्धतींचा अवलंब करणे आणि पाणीवाटपाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक बनले आहे.