बारामती: एका वाहतूक व्यावसायिकास तोतया व्यक्तीने फोन करत दिल्लीसाठी काही भाडे असेल तर कळवा असे सांगितले. बारामतीतून भाडे दिल्यावर सुमारे 78 लाख 75 हजारांच्या दूध पावडर पिशव्या बनावट क्रमांकाच्या वाहनात भरत तोतयेगिरी केली. याप्रकरणी दोघांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सियाराम रमेश शर्मा (रा. अडगाव, जि. नाशिक, मूळ रा. हरीता, राज्य - हरियाणा) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे श्रीराम ट्रान्सपोर्ट कॅरिअरमध्ये कमिशन एजंट म्हणून काम करतात. 13 नोव्हेंबर रोजी त्यांना त्यांच्या कार्यालयाच्या मोबाईलवर एकाचा फोन आला. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव राम सहाय असे सांगितले. माझी 30 टन मालाची क्षमता असणारी 14 चाकी गाडी बारामती येथे उभी आहे. दिल्लीसाठी काही माल घेऊन जायचा असेल तर सांगा, असे त्याने सांगितले. त्यावर बारामतीतून गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे 30 टन दूध पावडर न्यायची असल्याचे फिर्यादीने त्यांना सांगितले. माल घेऊन जाण्यासाठी भाड्यापोटी 1 लाख 11 हजार रुपये देण्याचे ठरले.
फिर्यादीने गाडीचे आरसी बुक व भाडे देण्यासाठी बॅंक खात्याचे डिटेल्स मागितले. ते समोरील व्यक्तीने त्यांना दिले. आरजे-11, जीसी-1763 ही गाडी हा माल नेईल, असे सांगण्यात आले. तसेच चालकाचा क्रमांक देण्यात आला. फिर्यादीने चालकाशी संपर्क केला असता त्याचा मोबाईल क्रमांक बंद लागला.
त्यांनी सहाय नाव सांगणा-या व्यक्तीला फोन केला असता त्यांनी चालकाचा फोन बंद पडला आहे, दुसरा क्रमांक घेतला की तो तुम्हाला फोन करेल, काही चिंता करू नका, तुम्ही भाड्यापोटी ॲडव्हान्स रक्कम पाठवा असे सांगितले. फिर्यादीने त्यांना 29 हजार रुपये सहाय याने दिलेल्या खात्यावर पाठवले. त्यानंतर या गाडीत बारामतीतून 30 टन दूध पावडर भरण्यात आली. परंतु, त्यानंतर चालक व सहाय या दोघांचेही मोबाईल बंद येऊ लागले.
फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी त्यांचा राजस्थानमधील मित्र बुरा चौहान याला चेकवरील पत्त्यावर चौकशी करण्यास सांगितले. चौहान याने तेथे जात सहाय याच्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांच्या नावे दुस-याच कोणी तरी ही तोतयेगिरी केल्याचे समोर आले. प्रत्यक्षात आरजे- 11, जीसी-1763 हे वाहन राजस्थानमध्येच गेल्या 15 दिवसांपासून उभे असल्याचे सहाय यांनी सांगितले. फिर्यादीला ज्या क्रमांकावर फोन येत होते, तो क्रमांक त्यांचा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गाडीला बनावट क्रमांक टाकून दोघांनी तोतयेगिरी करत 78 लाख 75 हजारांची दूध पावडर तसेच 29 हजारांची रक्कम लंपास केल्याचे समोर आले.