Baramati Thar Incident Video Pudhari
पुणे

Baramati Thar Incident: थार थांबवण्यासाठी पोलीस पुढे आले अन् चालकाने थेट अंगावरच घातली गाडी; बारामतीतील थरारक VIDEO

Baramati Thar Incident Video: पोलिसांनी नाकाबंदी अॅपच्या मदतीने तपास करत चार तासांत धीरज शेडगे याला अटक केली.

Rahul Shelke

Baramati Thar Incident Video: बारामती शहरात धक्कादायक घटना घडली आहे. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेली थार गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला थार चालकाने थेट धडक दिली. एवढेच नाही, तर पोलीस गाडीच्या बोनेटवर पडलेले असतानाही चालकाने गाडी न थांबवता पुढे नेली. काही अंतरापर्यंत पोलिसाला फरफटत नेल्यानंतर पोलिस कर्मचारी रस्त्यावर पडले. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली आहे. धीरज शेडगे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सम्यक चौकात नेमके काय घडले?

ही घटना बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बारामती वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले हे सम्यक चौकात वाहतूक नियंत्रणाची ड्युटी करत होते.

यावेळी भिगवण चौकाकडून पेन्सिल चौकाच्या दिशेने काळ्या रंगाची एक थार गाडी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. तसेच नंबर प्लेटही फॅन्सी पद्धतीची होती. त्यामुळे भोसले यांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला.

गाडी थांबल्यानंतर त्यांनी पुढील कारवाई सुरू केली. चालकाची माहिती घेण्यासाठी त्यांनी सोबत असलेल्या होमगार्डला गाडीजवळ पाठवले. दरम्यान, गाडीचा फोटो ई-चलन मशीनवरून काढण्यासाठी भोसले स्वतः गाडीच्या समोर उभे राहिले.

मात्र, याच वेळी चालकाने अचानक गाडी सुरू करून पुढे नेली. काही समजण्याच्या आत थारने भोसले यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते थेट गाडीच्या बोनेटवर आदळले.

बोनेटवरून फरफटत नेले

धडक बसल्यानंतरही चालकाने गाडी थांबवली नाही. उलट त्याने वेगाने गाडी पुढे नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भोसले काही अंतरापर्यंत गाडीच्या बोनेटवर अडकून राहिले.

अखेर त्यांची पकड सुटली आणि ते रस्त्यावर पडले. या घटनेत त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. मात्र, चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

चार तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. थार गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारे तिच्या मालकाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यासाठी पोलिसांनी नाकाबंदी अॅपची मदत घेतली. या माध्यमातून संबंधित गाडी फलटण तालुक्यातील राजाळे येथील दत्तात्रय शेडगे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या मालकाशी संपर्क साधला. तपासादरम्यान घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे हा थार चालवत असल्याची माहिती मिळाली.

यानंतर पोलिसांनी शोधमोहीम वेगाने राबवली आणि घटनेनंतर अवघ्या चार तासांत धीरज शेडगे याला अटक केली. तसेच या घटनेत वापरण्यात आलेली थार गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.

वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र, कारवाई करण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसालाच अशा प्रकारे गाडीने धडक देऊन फरफटत नेण्याची घटना गंभीर आहे. बारामतीतील या घटनेमुळे रस्त्यावर ड्युटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT