बारामती: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक टीका करतील, त्यांना त्यांचे काम करू द्या. मी आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विरोधकांना कामातून उत्तर देण्यावर विश्वास ठेवतो. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने बारामतीला स्मार्ट इनोव्हेशन सिटी बनविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आयआयटी, आयएम यासारख्याप्रतिष्ठित संस्था बारामतीत आणणार असल्याचेही ते म्हणाले. बारामती नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग््रेास पॅनेलच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी पृथ्वीराज जाचक, पुरुषोत्तम जगताप, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, संदीप बांदल, किरण गुजर, जय पाटील, अनिता गायकवाड, सचिन सातव आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्याला निधी देत असताना नेहमीच बारामतीला अधिकचे देण्याचा प्रयत्न केला, अन्य तालुक्यांची ठिकाणे व बारामतीची परिस्थिती पाहा. इथे झालेला बदल लक्षात येईल. सर्व प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. पण ते सोडविण्याची धमक माझ्यात आहे. त्यात कोणीही राजकारण आणू नये. निवडणुका आल्या की काही लोकांच्या अंगात येते. पण ते पाच वर्षे कुठे होते हे त्यांना विचारा, नगरपरिषद कामकाजात एआयचा वापर केला जाणार आहे. बारामतीत अन्य सहकारी संस्थांमध्येही हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. केवळ भाषणे करून, गोड बोलून विकास होत नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
शहरात पाच एकर जागेवर नर्सिंग कॉलेज, दहा एकर जागेवर कॅन्सर हॉस्पिटल, सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग अशी अनेक मोठी कामे हाती घेतल्याचे पवार यांनी सांगितले. मी दिलेल्या उमेदवारांना साथ द्या, त्यांच्याकडून कामे करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. काम करताना कोण चुकला तर त्याचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात सचिन सातव यांनी शहराच्या विकासाचा आढावा घेत आगामी काळात शहराला देशात पहिल्या क्रमांकावर नेले जाईल, असे स्पष्ट केले.