Sharadking Pomegranate Pudhari
पुणे

Sharadking Pomegranate Variety Approval: बारामतीतील ‘शरदकिंग’ डाळिंब वाणाला शासनमान्यतेची शक्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

उत्पादन वाढविणाऱ्या ‘शरदकिंग’ वाणाला अनुदान व मान्यता मिळाल्यास राज्यातील डाळिंब उत्पादकांना फायदा होणार

पुढारी वृत्तसेवा

बारामती: डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे वरदान ठरणाऱ्या ‌‘शरदकिंग‌’ डाळिंब वाणाला शासन मान्यता मिळवून देण्याच्या प्रयत्नांना यश येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन ‌‘शरदकिंग‌’ वाणाला शासनमान्यता तसेच विविध शासकीय योजनांमधून अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.

बारामती तालुक्यातील कांबळेश्वर व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‌‘शरदकिंग‌’ डाळिंब वाणाची लागवड केली असून, या वाणामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती कृषिमंत्र्यांना देण्यात आली.

फळांचा दर्जा, उत्पादनक्षमता आणि बाजारपेठेतील वाढती मागणी याबाबतची माहिती देखील देण्यात आली. अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‌‘शरदकिंग‌’ वाणाला शासनमान्यता मिळाल्यास राज्यभरातील डाळिंब उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.

शासकीय योजनांतर्गत अनुदानाचा लाभ मिळाल्यास डाळिंब शेतीला नवी चालना मिळणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा विषय ऐकून घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक बाबींचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

शासनमान्यता आणि अनुदानासंदर्भातील पुढील कार्यवाहीबाबतही त्यांनी अनुकूलता दर्शविली. या बैठकीस ‌’शरदकिंग‌’ डाळिंब वाणाचे जनक विठ्ठलराव भोसले, पुणे जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT