School Stationery Price Hike Pudhari
पुणे

Baramati School Shopping: बारामतीत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी; वाढत्या दरांनी पालकांची चिंता वाढली

शाळा सुरू होण्यापूर्वी बाजारपेठा गजबजल्या; वह्या, पुस्तके आणि शालेय साहित्याच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती शहर व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये सोमवार (दि. १५) पासून सुरू होत आहेत. शालेय साहित्य खरेदीसाठी बारामती बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालक वह्या, पुस्तके, शालेय गणवेश, बूट, दप्तर, पाणी बॉटल तसेच अन्य आवश्यक साहित्य खरेदी करण्यात व्यस्त आहेत.

शालेय साहित्य विक्री करणारी दुकाने सध्या ग्राहकांनी गजबजून गेली आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत खरेदीदारांची लगबग सुरू आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांना मुलांच्या शिक्षणासाठी अधिक खर्च करावा लागत असल्याने आर्थिक ताण जाणवत आहे. कागद, प्लास्टिक, शाई तसेच वाहतूक खर्चात झालेल्या वाढीचा परिणाम शालेय साहित्याच्या दरांवर झाला आहे.

यामुळे वह्या आणि पुस्तकांच्या किमतींमध्ये सरासरी १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच पेन, कंपास बॉक्स, पाण्याच्या बाटल्या, टिफीन बॉक्स आणि दप्तरांच्या दरातही वाढ झाली आहे.

यावर्षी काही वर्गांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके व संच खरेदी करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पालकांचा खर्च आणखी वाढला आहे. शिक्षणाचा वाढता खर्च अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या तयारीत विद्यार्थी उत्साहात असले तरी वाढत्या किमतींमुळे पालकांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT