शिवनगर: प्रगत तालुका अशी ओळख असलेल्या बारामती तालुक्याच्या ग््राामीण भागात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्यामुळे गावागावांत गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागल्या आहेत. हातभट्टीची दारू, मटका, जुगार, गांजा तस्करी यांसारख्या अवैध व्यवसायांनी ग््राामीण अर्थव्यवस्थेसोबतच सामाजिक स्वास्थ्यही बिघडवले आहे. विशेष म्हणजे या कृत्यांना स्थानिक पोलिसांचे अभय आहे की काय? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
शेतात आणि ओढ्याकाठी चालणाऱ्या हातभट्ट्यांचे लोण आता थेट गावातील गल्लीबोळापर्यंत पोहोचले आहे. ढाबे आणि टपऱ्यांच्या आडून छुप्या पद्धतीने होणारी अवैध दारू विक्री आता ओपन सिक्रेट झाली आहे. यामुळे अनेक सुखी संसार उघड्यावर पडत आहेत. केवळ दारूच नव्हे, तर ग््राामीण भागातील हॉटेल आणि टपऱ्यांच्या आडोशाने मटका आणि पत्त्यांचे क्लब जोमात सुरू आहेत. काही विशिष्ट भागांत दिवसाढवळ्या मटक्याच्या आकडे लावले जात आहेत. कमी वेळांत श्रीमंत होण्याचे आमिषदाखवून तरुणांची लूट केली जात आहे. गल्लोगल्ली असलेल्या या जुगारांच्या अड्ड्यांमुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. रात्रीच्या वेळी तर या ठिकाणांना गुन्हेगारांच्या अड्ड्याचे स्वरूप प्राप्त होते, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात देखील अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे कॉलेजला जाणारी तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत, तर या धंद्यांमुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून, किरकोळ वादातून तलवारी आणि कोयते निघण्याचे प्रकार गावागावांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
‘मोबाईल’वरून चालणाऱ्या ऑनलाइन जुगाराने देखील ग््राामीण भागात पाय पसरले आहेत. या धंद्यांमुळे मजुरी करणाऱ्या कामगारांचा कष्टाचा पैसा या अवैध धंद्यांच्या विळख्यात जात आहे. त्यामुळे कौटुंबिक कल वाढले असून, महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व उद्योग पोलिसांच्या नाकाखाली सुरू असताना प्रशासन नेमकी कोणाची पाठराखण करत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
महिलांची सुरक्षा धोक्यात
अवैध दारू अड्ड्यांमुळे परिसरात टवाळखोरांचा वावर वाढला असून, महिलांना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. एकूणच यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे.
कारवाईच्या नावाखाली धूळफेक
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी देऊनही कारवाईच्या नावाने केवळ धूळफेक केली जात आहे. पोलिसांची गाडी येण्यापूर्वीच अड्ड्यांवर निरोप पोहोचतो, ही कार्यपद्धती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. कारवाई होते पण पुन्हा काही तासांतच धंदे सुरू होतात. हे चक्र थांबणार कधी? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.