Baramati Rana Suryavanshi Attack Case Pudhari
पुणे

Baramati Rana Suryavanshi Case: बारामतीतील उद्योजकावरील गोळीबारप्रकरणात मोठा खुलासा, 2 लाखांची सुपारी अन् हल्ला; दोघांना अटक

पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयाकडून २३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी, हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामतीतील राणा शिपिंग कंपनीचे व उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर शस्त्राने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पार्थ वासुदेव अवथळे (वय १९ रा. पिंपरी गवरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा. सध्या रा. कर्वेनगर, दत्त मंदिर, कालवा रोड, स्पेन्सर चौक, पुणे) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५० रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. थोरात नगर, भिगवण, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही दि. २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात एका विधी संघर्ष बालकाचा सहभाग पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वासताच्या सुमारास पायलट ढाब्याजवळ, पालखी महामार्गजवळ राणा सूर्यवंशी यांच्यावर दोघांनी शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिली होती. त्यानुसार, बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विधी संघर्षीत बालक व पार्थ अवथळे या दोघांना ज्ञानदेव शिंदे याने हा गुन्हा करण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते असे तपासात निष्पन्न झाले आहे; परंतु राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन आरोपींना पुणे शहर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांचा ताबा बारामती तालुका पोलिस ठाण्याकडे दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT