Baramati Power Marathon Pudhari
पुणे

Baramati Power Marathon: बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये ७,२७० धावपटूंचा सहभाग; १० लाखांची पारितोषिके

२९ नोव्हेंबरला मॅरेथॉन, २७ पासून तीन दिवसीय क्रीडा महोत्सव; दिवंगत अजित पवार यांना स्पर्धा समर्पित, ३० स्टॉल्सचा स्पोर्ट्स एक्स्पो

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित बारामती पाॅवर मॅरेथाॅन स्पर्धा रविवारी (दि. २९) पार पडणार आहे. तत्पूर्वी दि. २७ नोव्हेंबरपासून ३ दिवसीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

यंदाची मॅरेथाॅन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केली आहे. एनईसीसी व व्हेंकोब चिकन यांच्या सहयोगाने ही मॅरेथाॅन पार पडणार आहे. यंदा ७ हजार २७० धावपटूंचा सहभाग, १० लाखांची पारितोषिके आणि ३० स्टॉल्सचा स्पोर्ट्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ नोव्हेंबरला खा. शरद पवार यांच्या हस्ते एक्स्पोचे उद्‌घाटन

मॅरेथॉन महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी (दि. २७ ) सकाळी १० वाजता खासदार शरद पवार यांच्या हस्ते स्पोर्ट्स एक्स्पो आणि बिब डिस्ट्रिब्यूशनच्या उद्‌घाटनाने होणार आहे. या एक्स्पोमध्ये तब्बल ३० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा ब्रँड्सची उत्पादने येथे असतील. शुक्रवार आणि शनिवारी या दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पोर्ट्स एक्स्पो आणि बिब डिस्ट्रिब्यूशन सुरू राहणार आहे. एक्स्पोसह गेम्स, मॅजिक शो आणि मनोरंजनाची मेजवानी मॅरेथाॅनमध्ये अनुभवता येणार आहे. यामध्ये विविध गेम्स, मॅजिक शो, फूड स्टॉल्स आणि मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम असणार आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

दि. २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मॅरेथाॅनचा शुभारंभ रेल्वे मैदानातून होणार आहे. ४२ किलोमीटर फुल, २१ किलोमीटर हाफ, १० किलोमीटर रन व ५ किलोमीटर फन रन या चार प्रकारात ही मॅरेथाॅन पार पडेल. ४२ किलोमीटरचा फ्लॅग ऑफ पहाटे ४ वाजता २१ किलोमीटरचा ६ वाजता, १० किलोमीटरचा ६.३० वाजता, तर ५ किलोमीटरचा ७.५५ वाजता होणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये चारही गटांसाठी एकूण १० लाखांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक गटातील प्रथम ३ धावपटूंचा गौरव केला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जा आणि धावपटूंसाठी विशेष सुविधा

वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या निकषांनुसार प्रमाणित व मोजलेला मार्ग आणि 'एआयएमएस'च्या सहकार्यामुळे बारामती पॉवर मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. मॅरेथाॅन मार्गावर हायड्रेशन सपोर्ट, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन मदत, स्वयंसेवकांची फळी, उच्च दर्जाचे टी-शर्ट, आकर्षक फिनिशर मेडल्स आणि पौष्टिक नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सन २०२३ मध्ये अवघ्या ७२७ धावपटूंच्या सहभागाने सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये यंदा ७ हजार २७० धावपटूंनी नोंदणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT