Ajit Pawar Pudhari
पुणे

Baramati Politics: अजितदादांनंतर नेत्यांना ‌‘ग्राऊंड लेव्हल‌’वरच झुंजावे लागणार!

‘दादांच्या’ छत्रछायेशिवाय स्थानिक नेत्यांसमोर आव्हान; आता जमिनीवर काम करण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर : दशकानुदशके बारामतीचा विकास आणि राजकारण ज्यांच्या नावाभोवती फिरत राहिले, त्या अजितदादांच्या जाण्याने बारामतीच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‌‘दादा‌’ असेपर्यंत केवळ त्यांच्या शब्दावर निवडणुका जिंकणाऱ्या अनेक स्थानिक नेत्यांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले असून, यापुढे त्यांना थेट ‌‘ग््रााऊंड लेव्हल‌’वर जाऊनच काम करावे लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

अजितदादांच्या निधनामुळे बारामतीच्या राजकारणाने मोठी कलाटणी घेतली आहे. आजवर दादांचे नाव आणि कामाच्या वलयाखाली निवडून येणाऱ्या अनेक स्थानिक नेत्यांची आता मोठी अडचण होणार आहे. दादा... बघून घेतील या मानसिकेतून बाहेर पडून आता या नेत्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरून घाम गाळावाच लागेल; अन्यथा बारामतीकर त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा स्पष्ट संदेश राजकीय वर्तुळातून येत आहे.

बारामती तालुक्यात अजित पवारांची पकड इतकी मजबूत होती की, दादांच्या एका शब्दावर अनेक कामे होत होती. कार्यकर्त्यांना समस्या सोडवण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागत नसे. प्रशासकीय कामांवर त्यांचा असलेला वचक आणि नियोजनाची शिस्त यामुळे अनेक स्थानिक नेते केवळ ‌‘मध्यस्थ‌’ म्हणून काम करत होते; मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे. सामान्य मतदारांच्या थेट प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ आता या नेत्यांवर आली आहे.

अनेक नेत्यांचा सराव केवळ बैठका घेण्यापुरता मर्यादित राहिला आहे. आता गावगाड्यात जाऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क वाढवावा लागेल. दादांच्या एका फोनवर होणारी कामे आता नेत्यांना पाठपुराव्याने करून घ्यावी लागणार आहेत. दुसरीकडे अजित पवारांनंतर पक्षाची आणि गटाची एकजूट टिकवून ठेवणे, हे स्थानिक नेत्यांसाठी ‌‘अग्निपरीक्षा‌’ ठरणार आहे.

दुसरीकडे, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्येही मोठी अस्वस्थता आहे. आपल्या समस्या थेट मांडण्यासाठी जो ‌‘पक्का आधार‌’ होता, तो गेल्यामुळे आता स्थानिक नेत्यांनी अधिक सक्रिय व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देणाऱ्या नेत्यांनाच आता बारामतीकर स्वीकारतील, असे चित्र दिसत आहे.

थोडक्यात सांगायचे तर बारामती तालुक्यातील नेत्यांसाठी आता आराम हराम आहे. जर त्यांनी स्वतःला जमिनीवरच्या कामात झोकून दिले नाही, तर आगामी काळात राजकीय अस्तित्व टिकवणे त्यांना कठीण जाईल.

नावाच्या जोरावर निवडणूक जिंकणे कठीण

अजितदादांची जागा कोणी घेऊ शकणार नाही, हे सत्य आहे. परंतु, ज्या स्थानिक नेत्यांना आपली पदे टिकवायची आहेत त्यांना आता अजित पवारांचा कार्यकर्ता ही ओळख कामातून सिद्ध करावी लागेल. केवळ नावाच्या जोरावर आता निवडणुका जिंकणे कठीण आहे.

ऊर्जेने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज

दादांची कामाची पद्धत पहाटेपासून सुरू व्हायची. त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांना आणि जनतेला आधार देण्यासाठी त्याच ऊर्जेने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. जे नेते आता केवळ वारसदार म्हणून मिरवतील, त्यांना जनता घरचा रस्ता दाखवेल, हे मात्र निश्चित.

आता ‌‘वशिला‌’ नाही ‌‘काम‌’च बोलेल

अजितदादांची कामाची पद्धत बुलेट ट्रेनसारखी होती. आता त्या वेगाला साजेसे काम जर स्थानिक नेत्यांनी केले नाही, तर मतदारांचा कौल बदलण्यास वेळ लागणार नाही. आता ‌‘वशिला‌’ नाही तर ‌‘काम‌’च बोलेल, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT