बारामती: गाळ्यासमोरील पॅसेजमधून ये-जा करण्याच्या कारणावरून कात्रीने छातीवर वार करून एकाला गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. या प्रकरणी मनोहर निवृत्ती डेंगळे (रा. सक्सेस चेंबर्स, मारवाड पेठ, बारामती) यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 30 जून रोजी घडली.
या प्रकरणी मोहन बोराटे (वय 52, रा. कसबा, माळीगल्ली, बारामती) यांनी फिर्याद दिली. त्यांच्यावर सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराटे यांचा मुलगा प्रतिक आणि त्याचा मित्र श्रेयश शिवाजी ढवळे यांचे सक्सेस चेंबर्स बिल्डिंगच्या बेसमेंटमधील गाळा क्र. 14 मध्ये आर्किटेक्चरल ऑफिस आहे. याच्या शेजारी डेंगळे यांच्या मालकीचे दोन गाळे आहेत. दोन्ही कार्यालयांसाठी सामायिक सार्वजनिक पॅसेज वापरात आहे.
मात्र, डेंगळे यांनी या पॅसेजमध्ये बंद पडलेली झेरॉक्स मशीन, बाकडे, खुर्च्या इत्यादी अडथळा निर्माण करणार्या वस्तू ठेवल्यामुळे येणार्या ग्राहकांना अडचण निर्माण होत होती. याबाबत त्यांना फिर्यादीने समजावूनही सांगितले होते. परंतु त्यांनी फिर्यादीलाच शिविगाळ, दमदाटी केली होती.
दि. 30 जून रोजी फिर्यादी हे मुलगा प्रतिक व त्याचा मित्र श्रेयस, श्रेयसचे चुलते शशिकांत ढवळे, रोहित बाचल, शेजारील नाज टेलर हे लोक डेंगळे यांना येण्या-जाण्याच्या कारणावरून वाद घालू नका, असे सांगत होते.
यावेळी फिर्यादीने डेंगळे यांना तुम्ही माझ्या मुलाचा मित्र श्रेयश याच्यावर हात का उचलला अशी विचारणा केली. त्यावर डेंगळेंनी त्यांच्या हातातील लोखंडी कात्रीने फिर्यादीच्या छातीवर मारून दुखापत केली. ’तुला जीवे ठार मारेन,’ अशी धमकीही दिली. रोहित बाचल यांनी जखमी झलेल्या फिर्यादीला उपचारासाठी दाखल केले. या घटनेत फिर्यादींना चार टाके पडले आहेत.