

पुणे: जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत 10 लाख शेतकर्यांपैकी केवळ 6 लाख शेतकरीच प्रत्यक्ष शेती करत असल्याचे अॅग्रीस्टॅक योजनेच्या तपशीलावरून समोर आले आहे. जिल्ह्यातील केवळ 6 लाख शेतकर्यांनीच हा ओळख क्रमांक घेतला आहे.
त्यामुळे उर्वरित 4 लाख 12 हजार 415 नागरिकांच्या नावावर शेती असली तरी ते शेती करत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जमाबंदी आयुक्तांना कळविले आहे. (Latest Pune News)
राज्यात शेतकरी, त्यांच्या नावावरील शेती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडून अधिकार अभिलेखात नावनोंदणी करण्यात येत आहे. यातून अॅग्रीस्टॅक ओळख क्रमांक प्रत्येक शेतकर्याला देण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष शेती नावावर असलेल्यांची संख्या जास्त असून ओळख क्रमांक घेतलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी अशा शेतकर्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकार्यांना दिले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातही अशी पडताळणी करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वच शेतकर्यांना कृषी विभागाच्या आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान आणि पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. आतापर्यंत 5 लाख 42 हजार 556 शेतकर्यांनाच अॅग्रीस्टॅक ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
अजून 84 हजार 130 शेतकर्यांना तो देता येईल असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे. तर, 4 लाख 96 हजार 545 शेतकर्यांना अजून ओळख क्रमांक देण्यात आलेला नाही. त्यातील अजून 84 हजार 130 शेतकर्यांना हा ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. उर्वरित 4 लाख 12 हजार 415 शेतकर्यांना हा क्रमांक देता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जमाबंदी आयुक्तांना दिलेल्या अहवालात पाच गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले, परगावी राहणारे, नव्याने वारस नोंद झालेले, सरकारी कंपनी- संंस्था असलेले खातेदार यांची पडताळणी करून ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकार्यांनी केली आहे. त्यानुसार सुमारे 4 लाख 21 हजार 415 अर्थात 40 टक्के जणांनी यात नोंदणी केलेली नाही किंवा करणार नाहीत. जिल्ह्यातील शेतकरी करण्याची संख्या 6 लाख असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात 10 लाख 39 हजार जणांच्या नावावर सातबारा
जिल्ह्यात सर्व 13 तालुक्यांत 10 लाख 39 हजार 101 नागरिकांच्या नावावर सातबारा उतारा अर्थात शेती आहे. त्यात सर्वाधिक 1 लाख 26 हजार 89 शेतकरी बारामती तालुक्यात आहेत. तर हवेली तालुक्यात ही 59 हजार 416 शेतकरी आहेत
जिल्ह्यातील 5 लाख 42 हजार 556 शेतकर्यांनाच ’अॅग्रीस्टॅक ओळख क्रमांक’ देण्यात आला आहे. 84 हजार 130 शेतकर्यांना तो देता येईल, असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे.
- नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा