Arrest Pudhari
पुणे

Baramati Molestation Attack Arrest: बारामतीत छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या भावावर प्राणघातक हल्ला; वर्षभर फरार आरोपी अखेर अटकेत

विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरातील घटना; सराईत गुन्हेगाराला बारामती तालुका पोलिसांनी एमआयडीसीतून पकडले

पुढारी वृत्तसेवा

बारामती: विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडे व कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. गौरव दिलीप टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणदरे, ता. बारामती) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना दि. 15 जानेवारी 2025 रोजी घडली होती. या संतापजनक घटनेत फिर्यादी आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबाबत आरोपीला जाब विचारण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर हातातील लोखंडी कडे व लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस कलम 118(2), 115(2), 74, 75, 78 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले हा घटनेनंतर वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे दि.19 रोजी एमआयडीसी परिसरातून आरोपीस अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या.

धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वीही भिगवण, बारामती तालुका व बारामती शहर पोलिस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. ही कारवाई संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, अप्पर पोलिस अधीक्षक आणि सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री भगत, कल्याण शिंगाडे आणि पोलिस अमलदार मनोज पवार, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, दादा दराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री भगत करत असून, न्यायालयाने आरोपीस पोलिस कोठडी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT