बारामती: बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने सोमवार (दि. 1) पासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. त्यानुसार गायीच्या दुधाला 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी 35 रुपये प्रतिलिटर दर दिला जाणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी दिली.
बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या 265 प्राथमिक दूध संस्था आहेत. संघाकडून प्रतिदिन 2.25 लाख लिटर दूध संकलन केले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे कामकाज चालते. संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना दूध तपासणीसाठी अनुदानावर मिल्क अॅनालायझर, इलेक्ट्रिक वजन काटे व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.
यासह पशुवैद्यकीय सेवा-सुविधा, आयुर्वेदिक उपचार पद्धत, संकलन, प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चॉपकटर, मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादी अनुदानावर विक्री केली जाते. संघाचे पाऊच पॅकिंग दूध व श्रीखंड, आम्रखंड, पनीर, दही, ताक, लस्सी, तूप, बासुंदी, पेढा, कलाकंद, खवा इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन असून, ते नंदन या ब्रॅण्डने विक्री केले जाते.
नंदन दूध पॅकिंगची पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, शिर्डी, मालेगाव, लोणावळा, मुंबई, वाशी, रोहा, महाड, संभाजीनगर, अहिल्यानगर आदी शहरात विक्री होते. पुणे व मुंबईतील नामांकित हॉटेल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, नामांकित कंपन्या व हॉस्पिटल्स आदी ठिकाणी पाऊच पॅकिंग दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे.
दूध उत्पादक शेतकर्यांसाठी संघाकडून वाजवी दरात बीओपी बॅगमध्ये नंदन सुप्रिम, नंदन गोल्ड, नंदन गोल्ड प्लस, नंदन सिल्व्हर, नंदन काफस्टार्टर, नंदन गर्भसत्व आदी पशुखाद्य तसेच नंदन मिल्कमीन, नंदन समृद्धी इत्यादी दर्जेदार उत्पादने उत्पादित करून ती विकली जात आहेत, असेही कोकरे यांनी सांगितले. संघ दूध उत्पादकांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.