मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथील बेंडेमळा येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात चोरी झाली आहे. येथील अंदाजे 1 लाख रुपये किंमतीच्या स्वामींच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत. ही चोरीची घटना सोमवारी (दि. 1) पहाटेच्या सुमारास घडली असून ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मंचर येथील बेंडेमळा येथे स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे. मंदिरात दररोजच्या आरतीचे काम प्रगती बेंडे या करतात. नेहमीप्रमाणे त्या रविवारी (दि. 31 ऑगस्ट) सायंकाळी आरती करून मंदिराचा दरवाजा लावून घरी गेल्या होत्या. (Latest Pune News)
दुसर्या दिवशी त्यांना स्थानिक नागरिकांनी मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी मंदिरात येऊन पाहिले असता मंदिराच्या गाभार्याचे दरवाजाचे कुलूप, कडी तोडून पादुका चोरून नेल्याचे लक्षात आले.
तसेच दानपेटीही फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दानपेटी साखळीने बांधलेली व कुलूप लावलेली असल्याने त्यातील रक्कम चोरून नेता आली नाही. स्थानिक नागरिकांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक महिला व एक पुरुष चोरी करताना दिसून आले.
त्याच चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून पादुका चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे, असे उद्योजक सतीश बेंडे पाटील यांनी सांगितले. याबाबत शेखर जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सुरक्षा व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
माजी ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या बंगल्यासमोरील गेटच्या समोरच श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. तेथे चांदीच्या पादुकांची चोरी झाली. मंचर-बेंडेमळा येथे काही दिवसांपूर्वी रस्त्याने पायी जाणार्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्यात आले.
त्यामुळे येथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथकर दिवे सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र त्याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी प्रगती बेंडे यांनी केली आहे.