Baramati Nagae Parishad Pudhari
पुणे

Baramati Majhi Vasundhara Abhiyan Award: ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’मध्ये बारामतीचा पुन्हा राज्यात पहिला क्रमांक

सलग दुसऱ्या वर्षी मानाचा पुरस्कार; पर्यावरणपूरक कामगिरीला राज्यस्तरीय दाद

पुढारी वृत्तसेवा

बारामती: माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये बारामती नगरपरिषदेला सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. शनिवारी (दि. 21) मुंबईत पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. पालिकेने हा पुरस्कार स्वीकारत तो दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्पण केला.

भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश तत्त्वांवर आधारित राज्यस्तरीय स्पर्धेत 40 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटामध्ये बारामती नगरपरिषदेने अव्वल क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ‌‘माझी वसुंधरा अभियान 4.0‌’ आणि 5.0 अशी सलग दोन वर्षे बारामती नगरपरिषदेला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि जतन यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध कामाची ही राज्यस्तरीय पावती आहे.

हा मानाचा पुरस्कार डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे राज्यपाल आचार्य देववत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. नगरपरिषदेकडून नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे, विद्यमान मुख्याधिकारी पंकज भुसे व नगरसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विशेष म्हणजे, यावेळी नगरसेवक व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी “आम्ही अजितदादांचे वसुंधरा दूत” असे लिहिलेल्या टोप्या परिधान करून उपस्थिती लावली होती. या प्रतीकात्मक कृतीतून त्यांनी अजितदादांप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पर्यावरणपूरक विचारांना पुढे नेण्याचा संदेश दिला. पालिकेला मिळालेल्या या पुरस्कारामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि विकासाभिमुख विचार कारणीभूत आहे. त्यांनी पाहिलेलं स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बारामतीचे स्वप्न पुरस्काराच्या निमित्ताने साकार झाले.

हा पुरस्कार केवळ नगरपरिषदेचा नाही, तर संपूर्ण बारामतीकरांचा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिलेल्या स्वच्छ व पर्यावरणपूरक बारामतीच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने आपण एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातही हे यश टिकवून ठेवत बारामतीला राज्यातच नव्हे तर देशातही आदर्श शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद
‌‘माझी वसुंधरा अभियान 4.0‌’ आणि 5.0 मध्ये सलग मिळालेला हा प्रथम क्रमांक म्हणजे सातत्यपूर्ण नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे फलित आहे. पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करत पुढील सर्व स्पर्धांमध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा निर्धार आहे.
पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT