

पुणे: शहरातील वाढते ध्वनिप्रदूषण आणि कर्कश आवाजांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, शहर वाहतूक विभागाने शुक्रवारी (दि.20) विशेष मोहीम राबवली. या कारवाईत प्रामुख्याने मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या 348 बुलेटस्वारांना दणका देत, सायलेन्सर जागीच काढून जप्त केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 19 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
अनेक बुलेटचालक कंपनीचा सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर वापरतात. त्यामुळे शहरात राबवलेल्या मोहिमेदरम्यान 348 बुलेटवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 3 लाख 34 हजारांचा दंड वसूल केला असून, गंभीर नियमभंग करणारी 148 वाहने देखील जप्त केली आहेत. केवळ बुलेटच नव्हे, तर इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. विविध प्रकरणांतून पोलिसांनी 15 लाख 73 हजार 800 रुपयांचा दंड सरकारी तिजोरीत जमा केला आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
मोटार वाहन न्यायालयात 53 मद्यपींवर खटले दाखल
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात 53 आरोपींचे खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी 44 आरोपींना न्यायालयाने एकूण 4 लाख 29 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला असून, तो तातडीने वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.