बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार आवारात मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले आहे. बाजार आवारात लिलावामध्ये मकेचे दर हमीभावापेक्षा कमी निघत असल्याने तसेच शेतकरी संघटनेच्या मागणीवरून समितीने हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती. शासनाने मंजुरी दिल्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
केंद्र शासनाचे किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2025-26मध्ये मका खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू आहे. ज्या मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी 28 फेबुवारी पर्यंत नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसमएसद्वारे मका घेऊन येण्याची तारीख कळविली जाणार आहे. दिलेल्या तारखेलाच शेतकऱ्यांना मका आणावी. मकेचा हमीदर 2400 रुपये क्विंटल असून प्रतिएकर 9.50 क्विंटल मका घेण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या अटीनुसार आवश्यक कागदपत्रे जमा करून नावनोंदणी करावयाची आहे. सदरचे केंद्र जळोची उपबाजार येथील भाजी मार्केट आवारातील गोदामात सुरू असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली
बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघात ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. आजवर 220 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी आणताना ती वाळवून, पुरेशी स्वच्छ करूनच आणावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केले आहे.
बारामतीच्या पुरवठा अधिकारी तितिक्षा बारापात्रे, निरीक्षक कचरे, मार्केटिंग फेडरेशनचे प्रमोद लोखंडे, बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघाचे व्यवस्थापक सुरेश काकडे, अमोल कदम, शशांक जगताप, प्रशांत मदने आणि बाजार समितीचे विभाग प्रमुख सूर्यकांत मोरे या वेळी उपस्थित होते.