जळोची : बारामती औद्योगिक वसाहतीत एका कंपनीवर मध्यरात्री शासकीय यंत्रणेने छापा घातल्याची खात्रीशीर माहिती असून, हा छापा कशासाठी होता व त्यातून यंत्रणेच्या हाती काय लागले? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
बारामती एमआयडीसीतील जी ब्लॉकमधील लघू कंपनीमध्ये रविवारी (दि. 16) पहाटे दीड ते दोनच्या सुमारास शासकीय अधिकारी रसायनांचे सॅम्पल घेत होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील व्हिडीओ समोर आला असून, इतरांना आतमध्ये येण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने, आम्हाला माहिती मिळाली असून, आम्ही या ठिकाणी आलो आहोत, असे सांगत आहे.
दरम्यान, या व्हिडीओत, एक अधिकारी सॅम्पल घेताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी ही कंपनी सुरू का होती, याविषयी आम्हाला कुठलीही माहिती आत्ताच देता येणार नाही, तसेच नेमकी कशा संदर्भात तक्रार आहे, याची माहिती उघड करता येणार नसल्याचे या व्हिडीओमध्ये बोलत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी वर्गाशी याबाबत संपर्क साधण्यात आला. परंतु त्यांनी माहिती जाहीर करण्यास नकार दिला. या कंपनीतील रसायनात नेमके काय होते? कशासाठी छापा टाकला? रात्रीच का छापा टाकला? छापा टाकल्यावर कंपनी सील का केली नाही? आदी प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. त्यातच शासकीय खात्यांकडून कमालीचे मौन बाळगले जात आहे.
संबंधित कंपनीमध्ये मानवी शरीराला अपायकारक रसायन तयार होत असल्याची चर्चा उद्योजकांमध्ये दबक्या आवाजात आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी अधिकारी व उद्योजक यांच्यात साटेलोटे झाले असल्याचेही बोलले जात आहे.