Honey Trap Pudhari
पुणे

Honey Trap Case: बारामतीत हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश; पीएसआयकडून ५० लाखांची खंडणी मागणी

व्हिडीओ कॉल ब्लॅकमेलिंगद्वारे जाळ्यात ओढून धमक्या; डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामतीमध्ये हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवणूक करून खंडणी उकळणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका पोलिस उपनिरीक्षकालाच जाळ्यात ओढून त्यांच्याकडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी प्रशांत सरतापे आणि त्याच्या पत्नीविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार हे बारामतीतील एका प्रशिक्षण केंद्रात गेस्ट लेक्चरर म्हणून येत असताना त्यांची काही लोकांशी ओळख झाली होती. याचाच फायदा घेत एका महिलेने मार्गदर्शनाच्या नावाखाली त्यांच्याशी संपर्क वाढविला. वारंवार फोन आणि व्हिडीओ कॉल करून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने कुंभार यांनी तिचा नंबर ब्लॉक केला; मात्र दुसऱ्या नंबरवरून संपर्क करून त्यांना धमकावण्यास सुरुवात झाली.

आरोपींनी व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर, ‌‘खोटा बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,‌’ अशी भीती दाखवून सुरुवातीला 50 लाख रुपयांची मागणी केली. तडजोड करीत ही रक्कम 25 लाख आणि शेवटी 10 लाखांपर्यंत खाली आली. 5 ते 13 एप्रिल या कालावधीत आरोपींनी कुंभार यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला होता.

दरम्यान, दडपणाखाली असलेल्या फिर्यादींकडून आरोपींनी तातडीने 1 लाख रुपये उकळले. ही रक्कम बारामती एमआयडीसी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ मध्यस्थांमार्फत स्वीकारण्यात आली तसेच फिर्यादीला गाडीत बसवून दमदाटी करणे आणि त्यांचा मोबाईल तपासण्याचे प्रकारही आरोपींनी केले. मात्र, कुंभार यांनी हुशारीने या सर्व धमकीवजा संभाषणाचे दुसऱ्या मोबाईलवर रेकॉर्डिंग केले, जे आता तपासात महत्त्वाचा पुरावा ठरले आहे. पोलिसांनी सर्व डिजिटल पुरावे जप्त केले असून, तांत्रिक तपास सुरू आहे.

पोलिसांचे जाहीर आवाहन

  • सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी व्हिडीओ कॉल किंवा वैयक्तिक संपर्क टाळा.

  • कोणतीही खासगी माहिती, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करू नका.

  • ब्लॅकमेलिंगचा अनुभव आल्यास न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT