बारामती: तब्ब्ल गेल्या तीन महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सोमवारी (दि. २) बारामतीमध्ये जोरदार हजेरी लावली. पहाटे ६ वाजता सुरू झालेला पाऊस ९ वाजेपर्यंत कोसळत होता. या पावसामुळे शहरातील रस्ते जल्मय झाले. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. बारामती बसस्थानक परिसरालाही पाण्याने वेढल्याचे दिसून आले.
बारामती शहर व तालुक्यावर यंदा पावसाची अवकृपा झाली. गेली तब्बल तीन महिने पाऊस दडी मारून बसल्याने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भीषण दुष्काळाची चाहूल बारामतीला जाणू लागली असतानाच सोमवारी भल्या सकाळपासूनच शहर व परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
सुमारे तीन तास हा पाऊस सुरूच होता. पावसामुळे रस्ते जलमय झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोसळलेल्या पावसामुळे शहरातील काही विद्यालयाने सुट्टी देण्यात आली. दरम्यान प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने साथ दिल्याने नागरिकांमध्ये मोठी आनंदाचे वातावरण आहे.