प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: राज्यात गुटख्यावर अधिकृत बंदी असताना बारामती तालुक्यात हा साठा येतो कुठून? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात २०१२ पासून गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या उत्पादन आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. परंतु, शेजारील राज्यांमध्ये विशेषतः कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये अशी कठोर बंदी नसल्यामुळे किंवा तिथे कारखाने सुरू असल्यामुळे तिथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी केली जाते.
तस्कर आंतरराज्यीय सीमा पार करण्यासाठी अत्यंत हुशारीने आणि वेगवेगळ्या छुप्या मार्गांचा वापर करतात. हे जाळे खालीलप्रकारे काम करते. कायदेशीर मालाचा आडोसा पोलिसांना किंवा तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून गुटख्याची पोती ही इतर जड किंवा तीव्र वास असणाऱ्या मालाच्या खाली लपवली जातात.
तीव्र वासाच्या वस्तू : सिमेंटच्या गोण्या, कांदे-बटाटे, खते किंवा रासायनिक पावडर यांच्या खाली गुटखा दाबला जातो; जेणेकरून गुटख्याचा किंवा सुगंधी तंबाखूचा विशिष्ट वास बाहेर येणार नाही. कोल्हापूर-कर्नाटक सीमा किंवा पालघर-गुजरात सीमेवरून येणाऱ्या भाजीपाल्याच्या आणि दुधाच्या गाड्यांमध्ये क्रेटखाली गुटखा लपवून सीमा पार केली जाते.
बनावट कागदपत्रे आणि ई-वे बिल
अनेकदा ट्रकमध्ये भरलेल्या मालाची बोगस ई-वे बिले आणि पावत्या तयार केल्या जातात. कागदपत्रांवर सुपारी, पावडर किंवा किराणा माल, अशी नोंद असते आणि अंतिम पत्ता दिल्ली किंवा इतर राज्यांचा दाखवला जातो; जेणेकरून महाराष्ट्रात तो माल उतरवताना संशय येणार नाही.
कंटेनर आणि अवजड वाहनांमध्ये 'फॉल्स सीलिंग' व गुप्त कप्पे
मोठ्या आंतरराज्यीय ट्रक्स आणि कंटेनर्समध्ये चालकाच्या केबिनच्या मागे किंवा वाहनाच्या तळाशी लोखंडी पत्रे वेल्डिंग करून छुपे कप्पे बनवले जातात. बाहेरून गाडी रिकामी दिसते किंवा त्यात वेगळाच कायदेशीर माल दिसतो. पण, आतल्या गुप्त कप्प्यांमध्ये गुटख्याची शेकडो पोती लपवलेली असतात.
पार्सल सेवा आणि कुरिअर गाड्या
नामवंत कुरिअर कंपन्यांच्या किंवा लॉजिस्टिक गाड्यांच्या नावाचा गैरवापर करून इतर पार्सलच्या आड गुटख्याचे बॉक्स लपवून आणले जातात.
'समृद्धी महामार्ग' आणि वेगवान राष्ट्रीय महामार्गांचा वापर
मुंबई-बेंगळुरू महामार्ग (कर्नाटक सीमा), मुंबई-अहमदाबाद हायवे (गुजरात सीमा) आणि नागपूर बाजूकडून येणारा समृद्धी महामार्ग हे तस्करांचे मुख्य मार्ग बनले आहेत. वेगवान प्रवासाचा फायदा घेऊन रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी हे ट्रक्स महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या वेशीवर पोहचवले जातात.