वडगाव निंबाळकर: उसासारखे नगदी पीक घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बारामती तालुक्यातील शेतकरी बदलत्या काळात आता कापूस पिकाकडेही वळला असल्याचे दिसून येत आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली असून त्यांचे पिकही बहरले आहे. सध्या कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील कोऱ्हाळे, होळ, वडगाव निंबाळकर, लाटे, मुढाळे ही गावे तशी ऊसासाठी प्रसिद्ध आहेत. कमी खर्चात सर्वाधिक उत्पादन घेण्याचा विक्रम या परिसरातील शेतकरी सातत्याने करत आले आहेत. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा दिसून येते.
परंतु आता बदलत्या काळात यंदा मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड करण्यात आली. हक्काचे पैसे मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी पाहत असल्यामुळे कापूस पीक घेण्याचे प्रमाण परिसरात वाढले आहे. त्यामुळे बागायती पट्ट्यातदेखील मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
या वर्षी 10 ते 20 क्विंटलपर्यंत एकरी कापसाचा उतारा मिळत असल्याचे दिसून येत आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने वेचणी महाग होत आहे. 21 नोव्हेंबरपासून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे लिलाव सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
कापूस वेचणी मजुरी परवडेना
कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असले तरी कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने कापूस उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. 10 रुपयांपासून 15 रुपयापर्यंत 1 किलो कापूस वेचणीचे दर आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरी जात असल्याचे शेतकरी बोलत आहेत.