Death Case  Pudhari
पुणे

Baramati Crime: बारामतीत थरारक घटना! जमिनीच्या वादातून वडील, सावत्र आई आणि भावाकडून तरुणाची हत्या

जोगवडी येथे वडील, सावत्र आई आणि सावत्र भावावर आरोप; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यातील जोगवडी येथे कौटुंबिक वादाचे अत्यंत भीषण रूप समोर आले आहे. शेतजमिनीच्या वादातून एका तरुणाची त्याच्या स्वतःच्या वडिलांनी, सावत्र आईने आणि सावत्र भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सूरज संजय गुळूमकर असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ८) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुळूमकर कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतजमिनीच्या मालकी आणि वाटणीवरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आणि घरातील वातावरण तणावपूर्ण बनले.

वाद विकोपाला गेल्यानंतर सूरज याच्यावर त्याचे वडील संजय धोंडीबा गुळूमकर, सावत्र आई माया संजय गुळूमकर आणि सावत्र भावाने मिळून हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या घटनेमुळे जोगवडी परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने नागरिकांकडूनही दुःख व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून नेमका वाद किती दिवसांपासून सुरू होता, तसेच घटनेच्या वेळी नेमके काय घडले याचा तपशील तपासातून समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT