Arrested Pudhari
पुणे

Baramati Crime: बारामतीतील दोन वृद्धांच्या हत्येचे गूढ उकलले; पैशांच्या चणचणीतून चुलत नातवाचं क्रूरकृत्य

शेरीचीवाडीतील दोन ज्येष्ठ महिलांच्या हत्या प्रकरणात सुपा पोलिसांची कारवाई; आरोपीकडून दागिने हस्तगत, पाच दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

सुपे: बारामती तालुक्यातील बाबुर्डीअंतर्गत शेरीचीवाडी येथे पाच दिवसांपूर्वी दोन ज्येष्ठ महिलांची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. घरातीलच चुलत नातू या हत्याकांडाचा आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी रविवारी (दि. ४) पहाटे साडेतीनच्या सुमारास जेरबंद केले.

विकास राजेंद्र लडकत (वय २६, रा. शेरीचीवाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मृत महिलांपैकी एका महिलेचा तो चुलत नातू, तर दुसऱ्या महिलेचा चुलत पुतण्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत गावातीलच एका व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संशयिताचा शोध घेऊन विकास लडकत याच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक चौकशी केली असता कर्जबाजारी झाल्यामुळे तसेच पैशांची गरज असल्याने हा गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून काही दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.

दरम्यान, आरोपीला बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT