Digital Arrest Pudhari
पुणे

Baramati Digital Arrest Scam: डिजिटल अटकेची भीती दाखवत बारामतीतील ज्येष्ठ महिलेला 46 लाखांचा गंडा

व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर पोलिस अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक; सायबर गुन्ह्याबाबत पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका ज्येष्ठ महिलेला अनोळखी व्यक्तिने व्हाटसअपद्वारे व्हीडीअो काॅल करत वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत डीजिटल अटकेची भिती दाखवत सुमारे ४५ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात शकुंतला उद्धव खर्डे (वय ७४, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. दि. १४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली.

एका मोबाईल क्रमांकाद्वारे अनोळखी व्यक्तिने खर्डे यांना व्हाटसअप काॅल केला. त्याने मी “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी बोलत असल्याचे खोटे सांगून पोलिस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगून त्यांना “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवण्यात आली.

त्या अज्ञात व्यक्तिने भिती व मानसिक दबाव निर्माण करून फिर्यादी यांच्या आर्थिक बाबींची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या बँकेतील एफडी काढून घेत ते पैसे वेगवेगळ्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरून फिर्यादीने पहिल्या वेळी ३४ लाख ६० हजार व दुसऱया वेळी ११ लाख रुपये असे एकूण ४५ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या बॅंक खात्यावर वर्ग करून घेतली. त्यानंतर त्याने संपर्क बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

कोणत्याही अज्ञात व्यक्तिने स्वतःला पोलिस, सीबीआय, ईडी किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फोन किंवा व्हीडीअो काॅल करत डिजिटल अरेस्ट किंवा अटक होईल अशी भिती दाखवल्यास नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठांनी त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत पैसे वर्ग करू नयेत, अोटीपी, बॅंक तपशील, वैयक्तिक माहिती देवू नये. भिती दाखवल्यास १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर त्वरीत संपर्क साधावा तसेच पोलिसांची मदत घ्यावी. अशी घटना घडल्यास तात्काळ तक्रार देणे अत्यंत महत्त्वाचे असते, जेणेकरून संबंधित बॅंक खात्यावर कारवाई करून रक्कम गोठणे शक्य होते.
श्रीशैल चिवडशेट्टी पोलिस निरीक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT